आमडदे बँकेतून तीन कोटींच्या दागिन्यांची चोरी : बँक कर्मचार्‍यांसह तिघे आरोपी जाळ्यात

जळगाव गुन्हे शाखेसह भडगाव पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल : बँक शिपायाचा चोरीत समावेश


भडगाव : तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी आणि नागरिकांनी तारण ठेवलेल्या सुमारे तीन कोटी रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी बँकेतील शिपायासह तीन आरोपींच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळत मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी तीन कोटी 17 लाख 79 हजार 850 रुपये किंमतीच्या दागिन्यांसह कुलूप आणि सीसीटीव्ही डीव्हीआरसह मिळून एकूण तीन कोटी 17 लाख 90 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला होता. कोट्यवधींच्या चोरीमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

या आरोपींना झाली अटक
बँकेचा शिपाई राहुल अशोक पाटील (24), विजय नामदेव पाटील (39), बबलू उर्फ विकास तुकाराम पाटील (37, तिघेही रा.आमडदे ) अशी या आरोपींची नावे आहेत. बँकेत झालेल्या धाडसी चोरीप्रकरणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक तन्मय देशपांडे (जळगाव) यांनी भडगाव पोलिसात फिर्याद दाखल केली होती.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस निरीक्षक कैलास गावडे, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, भडगावचे निरीक्षक अशोक उतेकर, भडगावचे सहा.निरीक्षक चंद्रसेन पालकर, उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, सहाय्यक फौजदार कैलास गीते, हवालदार विलास पाटील, नितीन रावते, किरण पाटील, ज्ञानेश्वर महाजन, स्वप्नील चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे
सहा.निरीक्षक जालिंदर पळे, एएसआय अशोक महाजन, विजयसिंग पाटील, हवालदार लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, रणजीत जाधव, प्रीतम पाटील, किशोर राठोड, विनोद पाटील्र, ईश्वर पाटील, उमेश गोसावी , श्रीकृष्ण देशमुख यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

जिल्हा पोलिस अधीक्षकांची धाव
कोट्यवधींच्या दागिण्यांची चोरी झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे, डीवायएसपी सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांनी भेट दिली व पुढील तपासाबाबत सुचना केल्या होत्या. भडगाव तालुक्यातील आमडदे येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा असून येथे मॅनेजर सह तीन कर्मचारी कार्यरत आहे. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 1 ते 2.30 वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी झाल्याची माहिती गावात पसरली. चोरी झाल्याची माहिती कर्मचार्‍यांनी गावातील नागरीकांना दिली. यावेळी घटनेची माहिती भडगाव पोलिसांना देण्यात आली.

बँक कर्मचार्‍याच्या सहभागाचा आधीपासून अंदाज
पोलीस घटनास्थळी पोहोचतात बँकेत चोरी करताना चोरांकडुन बँकेचे कुलुप तोडणे, तिजोरी फोडणे, लॉकर तोडणे असा प्रकार दिसुन येत नव्हता तसेच बँकेत असलेल्या रोकड रकमेला हात लावलेला नव्हता. यामुळे यात बँकेतीलच कर्मचार्यांचा सहभाग असावा, असा संशय प्रथमदर्शनी येत होता. दरम्यान, याच बँकेच्या मागे राहणारा शिपाई राहुल पाटील यास विचारपुस करत माहिती घेतली असता व पोलिसी खाक्या दाखवतात त्याने पोपटासारखी चोरीची कबुली दिली. या जबरी चोरीप्रकरणी बँक शिपाई राहुल पाटील व त्याच्या अन्य दोन साथीदार यांना अटक करण्यात आली. यावेळी जळगाव येथील श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, भडगाव पोलिसांनी अटकेतील आरोपींना मुद्देमाल कुठे लपविला आहे याबाबत खात्री केल्यानंतर तिघा आरोपींपैकी एका आरोपीच्या आमडदे शेत-शिवारातील जोगडाकडील शेतात व आंचळगाव रस्त्याकडील शेतात खड्डा करुन लपविलेले दागिणे आरोपीनी काढुन दिले.

या अधिकार्‍यांनी दिली भेट


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !