गुन्हेगारी नियंत्रणांसह सर्वसामान्यांना न्याय देणार : भुसावळातील नूतन पोलिस निरीक्षकांची भावना
भुसावळ : सर्वसामान्य व्यक्तीला पोलिस ठाण्यात आल्यानंतर सन्मानाची भावना देवून त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येईल शिवाय शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणार असल्याची भावना शहर पोलिस ठाण्याचे नूतन निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी व्यक्त केली.
भुसावळातील दोन्ही अधिकार्यांनी स्वीकारला पदभार
दोन्ही अधिकार्यांनी गुरुवारी सायंकाळी अनुक्रमे पोलिस ठाण्यात येवून पदभार स्वीकारला. यावेळी कर्मचार्यांनी तत्कालीन अधिकार्यांना निरोप दिला तर नूतन अधिकार्यांचे स्वागतही केले. भुसावळ शहरातील गुन्हेगारीचा अभ्यास करून ती नियंत्रणात आणण्यावर भर असेल शिवाय रात्रीची गस्त वाढवून वाढत्या-चोर्या, घरफोड्यांना आळा घालण्यात येईल, असेही या अधिकार्यांनी सांगितले.
भुसावळात एकाचवेळी दोन प्रभारी अधिकार्यांच्या बदल्या
भुसावळ शहरचे प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे यांची पहुर पोलिस ठाण्यात तर बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत यांची जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत दोन दिवसांपूर्वी बदली करण्यात आली होती. रीक्तत जागांवर अनुक्रमे शहर पोलिस ठाण्यासाठी गजानन पडघण तर बाजारपेठसाठी बोदवडचे निरीक्षक राहुल गायकवाड यांची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी नियुक्ती केली होती. गुरुवारी सायंकाळी दोघा अधिकार्यांनी तत्कालीन अधिकार्यांकडून पदभार स्वीकारला.


