कोट्यवधींच्या बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयीत सुनील झंवर यांना जामीन मंजूर
जळगाव : बहुचर्चीत बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयीत आरोपी सुनील झंवर यांना जामीन मंजूर झाल्याचे वृत्त आहे.
घोटाळ्याप्रकरणी दाखल होता गुन्हा
भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बहुतांश संचालक अद्यापही कारागृहातच आहेत. यानंतर बँकेवर जितेंद्र कंडारे यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले मात्र त्यांनी इतर दलालांना हाताशी धरून कोट्यावधींचा घोटाळा केल्याची उघडकीस आली होती. बीएचआर सहकारी संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी 27 नोव्हेंबर 2020 रोजी पुणे येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याच्यासह व्यावसायीक सुनील झंवर याचाही समावेश होता.


नाशिकमधून झाली होती अटक
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर झंवर हा फरार झालेला होता. त्याचे जामीन अर्ज अनेकदा नाकारण्यात आले होते. मध्यंतरी त्यांना अटकेपासून 15 दिवस दिलासा मिळाला होता. यानंतर मात्र त्यांच्या जामीनावर सुनावणी सुरू असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर 10 ऑगस्ट 2021 रोजी त्याला पहाटे पोलिसांनी नाशिक येथून अटक झाली आहे. यानंतर सुनील झंवर याचा जामीन अर्ज अनेकदा नाकारण्यात आला होता. तथापि, आज त्याला जामीन मंजूर करण्यात आल्याचे वृत्त आहे.
