मुक्ताईनगरात यात्रोत्सव पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या स्वच्छतेला वेग


मुक्ताईनगर : आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तीर्थक्षेत्र मुक्ताईनगरात माघवारी 28 फेब्रुवारी रोजी विजया दशमी तर 1 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव पर्व साजरे होत आहे. यात्रोत्सवानिमित्त भाविकांमध्ये चैतन्य पसरले असून भाविकांची मोठ्या संख्येने होणारी गर्दी पाहता त्यानुषंगाने जोमाने तयारीला वेग आला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्व-खर्चातून मुक्ताई मंदिर परीसर, दिंडी मार्गावरील काटेरी झुडपे, दिंडी विसाव्याची जागा तसेच खेळणे दुकाने, उंच पाळणे हे मुक्ताईच्या नवीन व जुन्या मंदिर परीसरात बसवण्यासाठी जेसीबीने साफ-सफाई सुरू केली आहे.

आरोग्य सभापतींना सूचना
यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील बोदवड रोड, भुसावळ रोड तसेच बुर्‍हाणपूर रोडवरील रस्त्याच्या दुभाजकांना लागून असलेल्या धूळ (माती) ची स्वच्छता केली जात असून शहरातील दिंडी मार्ग पूर्णपणे स्वच्छ करण्याच्या सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी नगरपंचायतीच्या स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापती शबाना बी.अब्दुल आरीफ यांना दिल्या आहेत. या सूचनेनुसार सभापती यांच्या आदेशानुसार मंगळवार, 22 मार्च रोजी नगरपंचायत पंचायतीचे स्वच्छता व आरोग्य कंत्राटदाराच्या कर्मचार्‍यांनी शहरातील रस्त्याच्या दुभाजक जवळील धुळी (माती) चे मोठ-मोठे ढीग काढून रस्त्यांची स्वच्छता सुरू केली आहे.



रस्त्यांची होतेय स्वच्छता
रस्त्याच्या आजूबाजूला व दुभाजकांजवळील सर्व स्वच्छता सुरू झाली आहे तसेच रस्त्यांवर झाडू मारण्याच्या सूचना मुकादम अनिल तायडे यांना दिल्या असल्याचे नगरपंचायतीच्या स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापती शबाना बी.अब्दुल आरीफ यांनी सांगितले. यावेळी नगरपंचायतीच्या स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापती शबाना बी.अब्दुल आरिफ, नगरसेवक संतोष मराठे, मुकेश वानखेडे, निलेश शिरसाट, पियुष मोरे, संतोष कोळी, राजेंद्र हिवराळे, आरीफ आझाद, नूर मोहम्मद खान, युनूस खान, वसंत भलभले आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !