एस.टी., ओबीसींची दोन लाख रीक्त पदे तातडीने भरली जाणार : राज्यमंत्री भरणे
भरती मोहिम राबवण्यासाठी अनुशेषाच्या रीक्त पदांची मागवली माहिती
मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून राज्यात शासकीय नोकरीतील एसटी, ओबीसी यांची 15 हजार 425 अनुशेषाच्या जागांसह एकूण दोन लाख 30 हजार 330 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 7,300 पदे सहा महिन्यांत भरण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित सर्व रिक्त पदेही ताबडतोब भरली जातील, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.
या आमदारांनी प्रश्न मांडून वेधले लक्ष
आमदार राहुल कुल, जयकुमार गोरे आदींनी राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती या मागासवर्गीय प्रवर्गातील जागा रिक्त आहेत, अनुशेष शिल्लक आहे, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर विधानसभेत उत्तर देताना भरणे यांनी या रीक्त जागा ताबडतोब भरल्या जातील, अशी माहिती दिली.


अनुशेषाच्या रीक्त पदांची माहिती मागवली : भरणे
शासकीय नोकर्यांमध्ये मागावर्गीयांच्या जागा भरण्यासाठी विमुक्त जाती (अ ) साठी 3 टक्के, भटक्या जमाती (ब) 2.5 टक्के, भटक्या जमाती (क) 3.5 टक्के, भटक्या जमाती (ड) 2 टक्के आणि इतर मागासवर्गासाठी 19 टक्के असे आरक्षण ठेवण्यात आले आहे. भरती मोहीम राबवण्यासाठी 14 फेबुवारी 2022 रोजी अनुशेषाच्या रिक्त पदांची माहिती मागवल्याचे भरणे यांनी सांगितले.
