स्थानिक पदाधिकार्यांची मदत नाही मग राष्ट्रवादी पक्ष वाढणार कसा?
रावेरात निरीक्षकांसमोर स्थानिक पदाधिकार्यांनी व्यक्त केली खदखद : स्वकीयांच्याच आरोपांमुळे बैठक गाजली
Rawer NCP Mitting रावेर : स्थानिक पदाधिकारी तालुक्याचे दौरे सोडून मुंबईचे दौरे करतात त्यामुळे स्थानिक स्तरावर त्यांची आम्हाला मदत मिळत नाही त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आम्ही वाढवायचा कसा? असा अंतर्मुख करणारा प्रश्न रावेरात कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत उपस्थित केला. स्वकीयांच्याच आरोप-प्रत्यारोपांमुळे राष्ट्रवादीची बैठक चांगलीच गाजली. विशेष म्हणजे हा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अविनाश आदीक यांच्या समोरच घडला तर त्यांना काही वेळ आपल भाषणदेखील थांबवण्याची नामुष्की ओढवली. अध्यक्षीय भाषण न होताच बैठक गुंढाळण्यात आली.
तक्रारींच्या पाढ्यामुळे गाजली बैठक
रावेरात राष्ट्रवादीची आढावा बैठक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कृषी उपन्न बाजार समितीत माजी आमदार अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला निरीक्षक अविनाश आदीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत सेवादल प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील व राजेश वानखेडे यांनी पक्षातील स्वकीयांच्या तक्रारीचा पाढा वाचला तर तालुक्यातील जबबादार राष्ट्रवादीचे पदाधिकारी तालुका सोडुन मुंबईचेच दौरे करीत असल्याने स्थानिक पातळीवर आम्हाला त्यांची कुठलीच मदत होत नाही त्यामुळे संघटन वाढवण्यास आम्हाला तालुक्यात प्रचंड त्रास होत असल्याची खदखद राष्ट्रवादीतील स्थानिक पदाधिकार्यांनी व्यक्त केली.


यांची आढावा बैठकीला उपस्थिती
बैठकीला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, शहराध्यक्ष महेमूद शेख, महिला तालुकाध्यक्ष रेखा चौधरी, पंचायत समिती सदस्य योगीता वानखेडे, दीपक पाटील, तालुका सरचिटणीस मंदार पाटील, राजेश वानखेडे, माया बार्हे, राष्ट्रवादी सरचिटणीस विनोद पाटील, तालुका उपाध्यक्ष तथा सरपंच गणेश महाजन, भागवत चौधरी, घनशाम पाटील, आर.डी.वाणी, राजेंद्र चौधरी आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिलासंसह व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका व शहराध्यक्षांनी मांडला आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे निरीक्षक अविनाश आदिक यांनी रावेरात पक्षाची आढावा बैठक घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी म्हणाले की, तालुक्यात राष्ट्रवादी दोन नंबरचा पक्ष असून आगामी निवडणुकांमध्ये एक नंबर केला जाणार असल्याची हमी त्यांनी दिली तर शहराध्यक्ष महेमूद शेख यांनी आम्हाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत शिवाय गत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून एकही उमेदवार दिला नसल्याने रावेर शहरात पक्षाचा एकही नगरसेवक नाही मात्र पक्षाने वरीष्ठ पातळीवरुन आम्हाला मदत केली तर स्थिती सुधारली जाईल, असा आशावाद शहराध्यक्ष महेमूद शेख यांनी व्यक्त केला.
