शस्त्र तस्कर पकडले : भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षकांसह कर्मचार्यांचा आयजींनी केला सन्मान
Bhusawal Bazarpet Police Station भुसावळ : शहरात शस्त्र तस्कर येणार असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार गावठी कट्ट्यांसह पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती तर पोलिस कोठडीत संशयीताने अन्य एकास गावठी कट्टा विक्रीची केल्याची माहिती दिल्यानंतर त्यासदेखील अटक करण्यात आली होती. बाजारपेठ पोलिसांनी शस्त्र तस्करीस प्रतिबंध घालून पोलिस दलाचे नाव उंचावल्याने या कारवाईची दखल घेत जिल्हा दौर्यावर आलेले नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्याहस्ते पथकातील अधिकारी व कर्मचार्यांचा जळगावात नुकताच गौरव करण्यात आला.
या अधिकारी, कर्मचार्यांचा गौरव
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये, हवालदार रमण सुरळकर, नाईक निलेश चौधरी, नाईक उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी आदींचा प्रशंसापत्र देवून गौरव करण्यात आला.


