शिंदाडच्या शेतकर्याची आत्महत्या
पाचोरा : सोयगाव तालुक्यातील पहुरीचा मूळ रहिवासी व हल्ली तालुक्यातील शिंदाडस्थित शेतकरी ज्ञानेश्वर माधवराव सावळे (28) यांनी 28 ऑक्टोबरला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे पहुरी व शिंदाड येथे शोककळा पसरली आहे. सावळे हे आपल्या कुटुंबियांसह चार वर्षांपासून मोलमजुरी करून कुटुंबाचा चरीतार्थ चालवत होते. गेल्या दोन वर्षांपासून येथील संजय यादव व्यवहारे यांची 10 एकर जमीन निम्याहिस्याने करीत होते. या वर्षी 10 पैकी सात एकरात कापूस व ती एकरात मक्याचे पीक पेरण्यात आले मात्र अतिवृष्टीने कापूस व मक्याचे पीक वाया गेले. त्यामुळे नैराश्यातून ज्ञानेश्वरने संजय व्यवहारे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ज्ञानेश्वर हे घरात काही न सांगता निघून गेल्याने त्याचा शोध सुरू असताना 31 ऑक्टोबरला वडील माधवराव सावळे यांना ज्ञानेश्वरचा मृतदेह विहिरीत आढळून आला. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


