पिंप्राळ्यातील घरफोडीची उकल : अट्टल घरफोड्या जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी
जळगाव : पिंप्राळ्यातील घरफोडीची उकल करण्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आले. अट्टल घरफोड्या सोन्या विलास काळे (वय 23, सलाबतपूर, ता.नवासे, जि.अहमदनगर) यास अटक करण्यात आली आहे. आरोपीने जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी घरफोड्या केल्याचा दाट संशय आहे. पिंप्राळ्यातील वैशाली महाजन यांच्याकडे 24 जुलै रोजी रात्री 11 वाजता ते 25 जुलै रोजी सकाळी 5 वाजेदरम्यान चोरी झाली होती. यात चोरट्याने काठी व हुकचा वापर करून उघड्या खिडकीतून 15 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज लांबवला होता.
यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहम यांना तपासासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार चंद्रकांत पाटील, हेड कॉन्स्टेबल अनिल इंगळे, सुरेश महाजन, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, नाईक संतोष मायकल, मिलिंद सोनवणे, रमेश चौधरी यांच्या पथकाने गोपनीय माहितीवरून सोन्या विलास काळे याच्या मुसक्या आवळल्या, आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेला मोबाइल जप्त करण्यात आला.



