भुसावळात नाट्यगृहाअभावी रंगभूमी दिन भर रस्त्यावर साजरा करणार
शहरातील रंगकर्मींचा आक्रमक पवित्रा : लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची अपेक्षा
भुसावळ : शहरात मराठी रंगभूमी दिनाचा कार्यक्रम रस्त्यावर साजरा करण्याचा आक्रमक पवित्रा शहरातील रंगकर्मींनी घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही शहरात बंदीस्त नाट्यगृह उभारणीचे काम रखडल्याने हा पवित्रा घेण्यात आला आहे त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील नाट्यकर्मी, रंगकर्मींनी बंदीस्त नाट्यगृहाची अनेक वर्षांपासून मागणी केली आहे मात्र या मागणीकडे सातत्याने दूर्लक्ष केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी शहरातील नाट्यकर्मी मराठी रंगभूमी दिनाला लोकप्रतिनिधींना निवेदन देवून बंदीस्त नाट्यगृहाच्या कामाकडे लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी केली जाते मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होते यामुळे या वर्षी शहरातील नाट्यकर्मींनी शहरात नाट्यगृह नसल्याने मराठी रंगभूमी दिन भर रस्त्यावर साजरा करण्याचे नियोजन केले आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता शहरातील वसंत टॉकीजजवळील महाराणा प्रताप चौकात रस्त्यावर नटराज पूजन करण्यात येणार आहे. रंगकर्मीनी व नाट्यप्रेमी रसिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


