गरीबरथ एक्स्प्रेसमधून सराफा व्यापार्याचे 13 लाखांचे दागिने लांबवले
भुसावळ विभागात दाम्पत्य झोपेत असताना चोरट्यांनी लांबवली बॅग : लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल
भुसावळ : अप गरीबरथ एक्सप्रेसने मुंबईला निघालेल्या सराफा व्यापारी दाम्पत्याची रेल्वेतून चोरट्यांनी बॅग लांबवली. बॅगेत तब्बल 12 लाख 80 हजारांचे सोन्याचे दागिने होते. खंडवा ते जळगाव दरम्यान ही घटना 3 रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी मुंबईहून हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला. दरम्यान, गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी खंडवासह भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून जळगाव, नाशिक येथे पथके रवाना केली असून शहरातील स्थानिक चोरट्यांच्या हालचालींची माहिती काढली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सराफा व्यापार्याची हॅण्डबॅग लांबवली
मध्यप्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात गाडरवारा गावात आशिष सोनी हे सराफा व्यापारी राहतात. त्यांचे सोन्या-चांदे विक्रीचे दुकान असून ते दिवाळीच्या सुटीनिमित्त पत्नीसह अप गरीब रथ 12187 गाडीच्या जी/4 कोचमधील बर्थ क्रमांक 40-41 वरून प्रवास करीत असताना मध्यरात्री 12.30 ते पहाटे साडेचार दरम्यान दाम्पत्याला झोप लागल्याची संधी चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी दाम्पत्याकडील हॅण्डबॅग लांबवली. या हॅण्डबॅगमध्ये सोन्याचा नेकलेस, अंगठी, बिंदी, चैन, बांगड्या, घड्याळ, मोबाइल, एटीएम कार्ड, आधारकार्ड, पॅन कार्ड असा मिळून एकूण 12 लाख 80 हजारांचा ऐवज होता. पहाटे जाग आल्यानंतर दाम्पत्याला बॅग चोरीची माहिती कळताच त्यांनी गाडीतील तिकीट निरीक्षकाला माहिती दिली मात्र तोपर्यंत गाडी भुसावळ विभागातून निघून गेल्याने मुंबई आल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला तर ही चोरी घटना भुसावळ विभागातील असल्यामुळे भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला.

रेल्वे प्रवास झाला असुरक्षित
काही दिवसांपूर्वी भुसावळचे डीआरएम विवेककुमार गुप्ता हे सपत्नीक प्रवास करीत असताना चोरट्यांनी त्यांचीही बॅग लांबवली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. रेल्वे अधिकारीच रेल्वेतून प्रवास करताना सुरक्षित नसताना सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेविषयीदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते तर आता तब्बल 13 लाखांची चोरी झाल्याने रेल्वेतील गस्त व लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या चोर्यांचा तपास लावण्यासह गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


