विविध समस्यांमुळे दर्यापूरच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात


ग्रामपंचायतीच्या विरोधात ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा : मोर्चाद्वारे तरुणांसह ग्रामस्थांनी मांडली कैफियत

भुसावळ : तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचासह 18 सदस्य असतानाही गावात मात्र विविध समस्या असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. विविध समस्यांनी संपूर्ण गाव ग्रासल्यामुळे साथीच्या आजारांची संख्येत वाढ झाल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांना ग्रामपंचायत सुविधा देत नसल्याने सोमवारी सकाळी नऊ वाजता काही तरुणांनी ग्रामपंचायत गाठत तक्रारी मांडल्या. प्रसंगी सरपंच पती व तीन सदस्य प्रसंगी उपस्थित होते. ग्रामपंचायतीकडून साध्या मुलभूत सोयी-सुविधादेखील पुरवल्या जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

ग्रामस्थ अडकले समस्यांच्या चक्रव्युहात
यंदा पावसाच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याने गाव समस्यांच्या चक्रात अडकले आहे. ग्रामस्थांनी तसेच तरुणांनी सोमवारी ग्रामपंचायतीचे सरपंच पती सुधाकर चौधरी, सदस्य जीवराम सुरवाडे, सुनील कोळी, नितीन सोनवणे, ग्रामसेवक आर.आर.पाटील यांच्याकडे समस्या मांडल्या. गावात पाण्याच्या पाण्याची समस्या बिकट असुन अशूद्ध पाणीपुरवठा होत असल्याने आरोग्य धोक्यात आले शिवाय गावातील सार्वजनिक शौचालयांची पाण्याअभावी बिकट अवस्था झाली आहे. पाण्याअभावी स्वच्छता नसल्याने गावकर्‍यांना उघड्यावरच शौचालयाला जावे लागते तर संपुर्ण गावाला काटेरी झुडपांचा वेढा पडल्याने जंगली प्राण्यांची भीतीदेखील वर्तवली जात आहे. ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचल्याने दुर्गंधी पसरली आहे तर येथील अंगणवाडीतील शौचालयाला सेप्टी ट्यांक नसल्याने साचलेले पाणी हाताने उपसून फेकावे लागत आहे, रस्त्यावर टवाळखोर वाहने सुसाट वेगाने चालवत असून रस्त्यांच्या दोन्ही बाजूला घरे आहे . लहान मुले रस्त्यावर खेळत असल्याने अपघाताचा प्रसंग येऊ शकतो त्याकरीता गतीरोधक अपेक्षीत असून यावेळी तरुणांनी गतीरोधकाची मागणी केली आहे .

साथीच्या आजारात वाढ
घाणीचा समस्यांमुळे गावात विविध आजारांच्या साथरोगांची लागण झाली असून डेंग्यूची लागण झालेला एक सदृश्य रुग्ण देखील अढळला असल्याने भीती व्यक्त होत आहे. दरम्यान गावात गटारी तुबंलेल्या असून उकीरडे साचले आहे शिवाय काटेरी झुडूप वाढली असून उघड्यावर ग्रामस्थ शौचास जात असल्याने साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची भीती आहे. ग्रामपंचायत प्रशासन दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

समस्या सोडवणार -सरपंच
मी सरपंच या नात्याने ग्रामपंचायतीचा कारभार घेऊन एक वर्ष झाले आहे परंतु गावकर्‍यांच्या सर्व समस्या सोडविण्यास पात्र आहे. गावातील समस्या मी माझ्या परीने सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे दर्यापूर सरपंच वंदना सुधाकर चौधरी यांनी सांगितले.

सोयी-सुविधांपासून ग्रामस्थ वंचित
गेल्या पाच वर्षापासून गावकर्‍यांना ग्रामपंचायतीने मूलभूत सोयी-सुविधांपासुन वंचित ठेवले आहे. आमच्या समस्या न सोडवल्या गेल्यास तरुण युवक वरीष्ठ प्रशासनाकडे तक्रार करू. तक्रारीची दखल घेतली न गेल्यास आंदोलन करू व ग्रामपंचायत बरखास्त करण्यासाठी प्रयत्न करणार असलयाचे ग्रामस् अजिंक्य लिलाधर कोळी यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !