भालोद आरोग्य केंद्रातील निवासस्थाने पडली ओस
कर्मचार्यांच्या अप-डाऊनमुळे रुग्णसेवेवर परीणाम : दखल घेण्याची अपेक्षा
यावल : तालुक्यातील भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांसाठी राहण्यासाठी नवीन खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यात ग्रामपंचायतीकडून माहिती घेतली असता त्या खोल्या वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांना राहण्यासाठी देण्यात आलेल्या आहेत परंतु या निवासस्थानामध्ये कुणीही कर्मचारी राहत नाहीत तर कर्मचारी अप-डाऊन करीत असल्याने रुग्णसेवेवर त्याचा परीणाम झाला आहे.
रुग्णांना फिरावे लागते माघारी
कर्मचारी जिल्ह्यातील विविध गावातून येत असल्याने त्याचा परीणाम रुग्णसेवेवर झाला आहे. अनेकदा रुग्णांना कर्मचार्यांची वाट पहावी लागते तर अनेकदा उपचार न घेताच माघारी परतावे लागले. मुख्यालयी मुक्कामी रहावे, असा नियम असताना येथे मात्र नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. शासनाने लाखो रुपये खर्चून निवासस्थानांची उभारणी केली असलीतरी कर्मचारी त्यात राहत नसल्याने हा खर्च पाण्यात गेल्याची भीती आहे. जनतेला योग्य प्रकारे सेवा मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय ? वैद्यकीय अधिकार्यांसाठी बांधलेल्या निवासस्थानाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून अशा सर्वच निवासस्थानाच्या अवतीभवती गवत वाढलेले आहे. जिल्हा परीषद अध्यक्षांनी अचानक भेट देऊन या भोंगळ कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.



