सण शांततेत साजरे करून शांतता अबाधीत राखा
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांचे आवाहन : रावेरात घेतली शांतता समितीची बैठक
रावेर : रावेर शहरवासी गेल्या अनेक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने नांदत असून आगामी ईद ए मिलाद सणदेखील शांततेत साजरा करावा, सोशल मिडियाचा वापर करतांना चुकीची पोष्ट कोणीही व्हायरल करण्याआधी खात्री करून घ्यावी तसेच राम मंदिराबाबत काही दिवसात निकाल लागणणार असून सर्वोच्च न्यायालयने दिलेला निकाल सर्वांनी मान्य करून शांतता अबाधीत राखावी तसेच उपद्रवी लोकांची माहिती पोलिस प्रशासनाने संकलीत केली असून त्यांचा लवकरच बंदोबस्त करणार असल्याची ग्वाही जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिली. ईद-ए-मिलाद व राज मंदिर निर्णयासंदर्भात बुधवारी रावेर पोलिस स्टेशनच्या आवारात शांतता कमेटीची बैठक झाली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी मार्गदर्शन करीत शांतता राखण्याचे आवाहन केले. बैठकीला निंभोरा एपीआय एम.आय.जानकार, एपीआय शीतलकुमार नाईक, एपीआय प्रकाश वानखेडे, माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी, माजी सभापती राजीव पाटील, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, नगरसेवक असदउल्ला खा, सादीक मेंबर, प्रल्हाद महाजन, अशोक शिंदे, जगदीश घेटे, महेमुद शेख, अॅड.योगेश गजरे, ज्ञानेश्वर महाजन, एम.ए.खान, अशोक गायकवाड, गयास शेख, यूसुफ खान, शफउद्दीन सर, डी.डी.वाणी, नगीनदास इंगळे, महिला दक्षता समितीचे श्रीमती कांता बोरा, संगीता अकोले, यांच्यासह मोठ्या संखने शांतता कमेटी सदस्य उपस्थित होते.

निकालावर भाष्य न करता शांतता राखा -उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे
यावल- मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद सण उत्साहात व शांततेत साजरा करण्यासह राम जन्मभूमी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्या निकालावर भाष्य न करता आलेला निकाल जनतेने मान्य करावा व शहरासह तालुक्यात शांतता कायम ठेवावी, असे आवाहन उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी केले. यावल पोलिस स्टेशनच्या वतीने मंगळवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. तहसीलदार जितेंंद्र कुवर अध्यक्षस्थानी होते.
सोशल मिडीयावर व्यक्त करू नये भावना
याप्रसंगी डीवायएसपी पिंगळे, तहसीलदार कुवर यांनी ईद-ए-मिलाद हा शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. येणार्या काही दिवसात अयोध्या रामजन्मभूमीबाबात सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल अपेक्षीत आहे. सर्वोच्च न्यायालय ही अंतीम आणि सर्वश्रेष्ठ न्यायदानाची संस्था असल्याने निकाल आल्यानंतर उत्साहात अथवा त्यावर कोणतीही सोशल मीडीयासह जाहीर प्रतीक्रीया देवू नये, निकाल काय असेल हे आपणास माहित नाही परंतु जो निकाल असेल तो सर्वधर्मीयांनी मान्य करण्याचे आवाहन करत शांतता कायम ठेवावी, असे आवाहनही पिंगळे यांनी केले .निकालाच्या दिवशी शहरातील सर्व धर्मातील प्रतिष्ठीतांनी शहरात फिरून शांततेचे आवाहन करावे, पोलिस विभागाकडून आवश्यक तो बंदोबस्त ठेवला जाईल, समाजकंटक आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. प्रसंगी हाजी शब्बीरखान मोहम्मदखान, किशोर कुळकर्णी, पुंडलीक बारी यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस सर्व धर्मातील प्रतिष्ठीत, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस निरीक्षक रवीकांत सोनवणे यांनी प्रास्ताविक करीत आभार मानले.


