पोलिस शिपायाला आता उपनिरीक्षक पदापर्यंत बढती : एसआरपीएफ कर्मचारी राज्य पोलिस दलात येणार
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ः शिर्डीत पोलिस निवासस्थानांचे उद्घाटन
Dilip Walse Patil अहमदनगर : शासनाने एसआरपीएफ मधील पोलिसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेतला असून आता पोलिस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचाही निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी येथे दिली. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अमंलदारांच्या 112 निवासस्थानांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.
दोन महिन्यात मिळणार हक्काची घरे
दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की, राज्यातील पोलिसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे. राज्यातील पोलिसांना पुढील दोन महिन्यांत 6,853 घरे उपलब्ध करून देण्यात येतील. कोरोना काळात पोलिसांनी रस्त्यावर येऊन चोवीस तास काम केले. गृह विभाग पोलीसांना घरे व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही, यासाठी काम करावे, अशा सूचनाही गृहमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे.


अंमलदारांना मिळाल्या फ्लॅटच्या चाव्या
दरम्यान, यावेळी अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात 2 महिला पोलिस व 1 पुरूष पोलीस अंमलदारास फ्लॅटच्या चाव्या हस्तांतरित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संयोजन अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, कार्यकारी अभियंता सुनिल सांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, हिरालाल पाटील यांनी केले.
माजी गृहमंत्री देशमुखांकडून पोलिस अधिकार्यांच्या बदल्यांमध्ये पदाचा गैरवापर : बार मालकांकडील वसुलीची रक्कम शिक्षण संस्थेत वळवली
