खड्ड्यांमुळे अपघात होवून वरखेडच्या महिलेचा मृत्यू
बोदवड : बोदवड-मलकापूर राज्य मार्ग क्रमांक 27 वरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडल्याने वरखेड येथील महिला गंभीर जखमी झाली होती. उपचार सुरू असताना शुक्रवारी या महिलेचा मृत्यू झाला. वंदना दिलीप पाटील (42, वरखेड, ता.बरेदवड) असे मृत महिलेचे नाव आहे.
सात दिवसात रस्त्याचे काम न केल्यास आंदोलन
बोदवड-मलकापूर रस्त्यावरील साईडपट्ट्या व खड्डे बुजवण्याचे काम श्री गजानन इंटरप्रायझेस या कंपनीला देण्यात आले होते शिवाय कामाचे आदेश 16 नोव्हेंबर 2017 रोजी काढण्यात आल्यानंतरही काम न झाल्याने खराब रस्त्यामुळे या महिलेचा नाहक बळी गेला, असा आरोप लालसिंग पंडित पाटील, सचिन राजेंद्र पाटील व दीपक संतोष माळी यांनी केला आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी तक्रार केली असून सात दिवसांच्या आत खड्डे व साईडपट्ट्या न भरल्या गेल्यास बांधकाम कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाच्या जाणीवपुर्वक दुर्लक्षामुळे वरखेड येथील महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप उभयंतांनी केला आहे.



