भुसावळात 19 रोजी स्वामी नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळा
भुसावळ : अनंत विभूषीत जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा व प्रवचनाचे भुसावळात 19 रोजी आयोजन करण्यात आले आहे. सुरभी नगरातील संतोषी माता सभागृहानजीकच्या प्रशस्त अशा पटांगणावर 19 रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी शनिवारी पत्रकार परीषदेत दिली.
19 रोजी निघणार शोभायात्रा
मंगळवार, 19 रोजी सकाळी आठ वाजता जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिरापासून पादुकांची शोभायात्रा प्रवचन स्थळापर्यंत काढण्यात येणार आहे. गुरूंच्या पादुकांचे आगमन झाल्यानंतर गुरूपूजन होईल व गुरूपूजनाची सांगता श्री लिलामृत ग्रंथ पारायणाने होणार आहे. दुपारी 12 ते 1 दरम्यान श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे ऑनलाईन प्रवचन होणार आहे तसेच यावेळी नाणिजधामचे प्रवचनकार प्रवचन देणार आहेत.

10 हजार भाविक येणार
पादुका दर्शन सोहळ्यासाठी खान्देशासह मध्यप्रदेशातून दहा हजारावर भाविक येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आयोजकांनी नियोजन केले आहे. भाविकांसाठी महाप्रसाद तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यशस्वीतेसाठी जिल्हा निरीक्षक अमोल कुलकर्णी, जिल्हा सेवाध्यक्ष डॉ.नामदेव बोरसे, जिल्हा महिलाप्रमुख विद्या वणीकर, तालुका सेवाध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मधुकर जावरे, जिल्हा सचिव शशीकांत राणे, जिल्हा धर्मक्षेत्रप्रमुख डिगंबर राणे तसेच जिल्हा सेवा व सर्व तालुका समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.


