भुसावळ-वरणगाव महामार्गावरील खड्डे न बुजवल्यास आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा इशारा : अपघाताच्या प्रमाणात वाढ
भुसावळ : भुसावळ-जळगाव दरम्यान महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असलेतरी भुसावळातील नाहाटा महाविद्यालयापासून वरणगावपर्यंत रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून धूळ उडत असल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे तसेच वाहने घसरून अपघाताच्या घटनादेखील घडत आहेत याकडे महामार्ग प्राधीकरण सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वाहने चालवताना तारेवरची कसरत
महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून यासाठी जास्त क्षमतेने भरलेले डंपर रोडवर चालत असल्याने व पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने वरणगाव-भुसावळ ते वरणगाव महामार्गावरील खडका चौफुली, लाल जैन मंदिर, साकरी फाटा, दीपनगर, हिरा मारोती मंदिर, फुलगाव या मार्गावर मोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरून वाहन चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच प्रचंड प्रमाणावर धूळ उडत असल्याने दुचाकीस्वारांना व वाहनधारकांना श्वसनाचे विकार तसेच डोळ्यांच्या विकार होत आहे. महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असल्याने या मार्गावरून दररोज मोठे डंपर जात येत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहने चालविताना जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत आहे. येत्या दोन दिवसात या महामार्गावरील खड्डे बुजवले न गेल्यास भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, भुसावळ शहराध्यक्ष दीपक धांडे, युवक तालुकाध्यक्ष निळू चौधरी, जीतू राणे, राजेश चौधरी, पप्पू जकातदार, गजानन वंजारी यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकत्यानी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.



