भुसावळ पालिकेतील विवाह नोंदणी दिरंगाईने उपमुख्याधिकारी व नगरसेवकांत तु तु मैं में !


भुसावळ : भुसावळ पालिकेत विवाह नोंदणी दिरंगाईने सुरू असल्याने याबाबत सूचना मांडण्यासाठी गेलेल्या नगरसेवक निर्मल कोठारींना उपमुख्याधिकारी सोमनाथ कोठूळे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने कोठारींनी चांगलाच संताप व्यक्त केला. पालिका अधिकार्‍यांच्या कारभाराने नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे नाव बदनाम होत असल्याचे गार्‍हाणे त्यांनी मांडले. पालिकेत जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी विभागात स्वाक्षर्‍यांचे अधिकार केवळ एकाच अधिकार्‍याला देण्यात आल्याने विवाह नोंदणीसाठी नागरिकांना आठ ते दहावेळा हेरझार्‍या घालाव्या लागत असल्याचे नगरसेवक कोठारी यांनी सांगितले.

स्थायी अधिकार्‍यांना अधिकार देण्याची मागणी
शहरात झालेल्या विवाहांची नोंदणी करण्यासाठी वधू, वर, वधूवर पक्षातील नातेवाईक, ब्राह्मण आदींना पालिकेत हेरझार्‍या घालाव्या लागतात. या विवाह नोंदणीच्या प्रमाणपत्रावर केवळ एकाच अधिकार्‍याला स्वाक्षरीचे अधिकार असल्याने संबंधित अधिकारी देखील वारंवार सुटीवर असल्याने ही नोंदणी रखडत असल्याने पालिकेच्या स्थायी अधिकार्‍यांना स्वाक्षरीचे अधिकार देण्यात यावेत, असा मुद्दा नगरसेवक निर्मल कोठारी यांनी उपमुख्याधिकारी सोमनाथ कोठूळे यांच्याकडे मांडला. मात्र कोठूळे यांनी समाधानकारक उत्तर न देता नगरसेवक निर्मल कोठारींना आपण आधी वेळ घेवून माझ्याशी बोलावे, इतर कामांचा ताण अधिक असल्याचे सांगत अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे कोठारींच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी कोठूळे यांना खडे बोल सुनावत केवळ आपल्या निष्काळजीमुळे नागरीकांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आठ ते दहा वेळा पालिकेत यावे लागते यामुळे शहराचे नाव खराब होते. नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांना या क्षुल्लक कारणामुळे नागरीकांसमोर खाली मान घालावी लागते, असा संताप केला. अखेर या वादात स्वत: नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी आदींनी कोठारी यांना शांत करीत कोठूळे यांना जबाबदारीचे भान ठेवून बोलावे तसेच विवाह नोंदणीच्या कामात दिरंगाई करु नये, अशी समज देवून वादावर पडदा टाकला.

चुकीचे उत्तरे दिल्याने संताप
विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर स्थानिक अर्धात शहरात राहणार्‍या अधिकार्‍यांना स्वाक्षरीचे अधिकार द्यावेत, इतकीच रास्त मागणी होती, मात्र उपमुख्याधिकारी कोठूळे यांनी प्रश्न समजून न घेता नाहक चूकीची अपमानकारक उत्तरे दिली, असे नगरसेवक कोठारी म्हणाले. शहरातील मुलींचे लग्न झाल्यानंतर विवाह नोंदणीसाठी त्यांना आपल्या पती व नातेवाईकांना घेवून पालिकेत नोंदणी प्रमाणपत्रासाठी हेरझर्‍या घालाव्या लागतात. शहरातील पालिकेच्या कारभाराचे वाभाडे यामुळे निघतात. अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे नगराध्यक्षांसह आमच्या सर्वच नगरसेवकांचे नाव नाहक बदनाम होते, असेही ते म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !