जामनेरच्या तरुणाचा मालखेड्याजवळ अपघाती मृत्यू
भरधाव दुचाकी समोरा-समोर धडकल्या : चौघे जखमी
पाचोरा : तालुक्यातील मालेखेडा गावाजवळ भरधाव दोन दुचाकींमध्ये धडक होवून जामनेर येथील राकेश समाधान लोणारी हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्या सोबत असलेले दीपक अरुण जाधव आणि अरविंद बाळू वाळेकर हे देखील जखमी झाले. तसेच दुसर्या दुचाकीवरील विलास पंडित राऊत आणि हरीश सुधाकर सोनी हे देखील जखमी झाले. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाचोराकडे जाताना मालखेडा गावापासून एक किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.
एक जागीच ठार, चौघे जखमी
जामनेर येथील राकेश समाधान लोणारी (25, रा.श्रीरामपेठ), दीपक अरुण जाधव (19) व अरविंद बाळू वाळेकर (20) हे तिघे बजाज पल्सर दुचाकीने ट्रिपल सीट पाचोराकडे जात असताना विलास पंडित राऊत (27) आणि हरीश सुधाकर सोनी (25, रा.सोयगाव जि.औरंगाबाद) हे दोघे दुचाकी एमएच.20.सीएक्स.8160) पाचोर्याकडून येत असताना दुचाकी धडकल्याने अपघात झाला. या अपघातात राकेश समाधान लोणारी हा ठार झाला तर अन्य चौघे जखमी झाले. त्यातील विलास राऊत याला डोक्याला जबर मार बसल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.



