खडक्यात ट्रॅक्टरखाली आल्याने मोठ्या आईचा अंत तर पुतण्या गंभीर
ट्रॅक्टरचे ब्रेक दुरुस्त करताना दुर्घटना : जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
भुसावळ : ट्रॅक्टरचे ब्रेक फिट करताना ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने वयोवृद्ध मोठ्या आईचा करुण अंत झाला तर पुतण्या गंभीर झाल्याची घटना तालुक्यातील खडका येथे गुरुवारी सकाळी 11.30 धांडेवाडा परीसरात घडली. या घटनेने खडका गावासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. तालुका पोलिसात मात्र या प्रकरणी कुठलीही नोंद नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या घटनेत लिलाबाई पांडुरंग धांडे (82) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा पुतण्या दिनेश उर्फ गिरीश वासुदेव धांडे (35) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रॅक्टरचे ब्रेक फिट करताना दुर्घटना
खडका गावातील धांडे वाड्यात गिरीश धांडे हा ट्रॅक्टरला रोटोव्हेटर लावून ट्रॅक्टरचे ब्रेक फिट करण्यासाठी ट्रॅक्टरखाली उतरला तर याचवेळी ट्रॅक्टर पुढे सरकल्याने त्याचवेळी लिलाबाई धांडे या गणेश कॉलनीत मुलांना डबा देवून रुग्णालयात जात असताना ट्रॅक्टरखाली सापडल्याने जागीच गतप्राण झाल्या तर गिरीश धांडेदेखील धावल्याने तोही ट्रॅक्टरखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवल्यानंतर डॉक्टरांनी लिलाबाई यांना मृत घोषित केले तर अत्यवस्थ गिरीश धांडे यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मृत लिलाबाई यांच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गुरुवारी रात्री शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत भुसावळ तालुका पोलिसात कुठलीही नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.


