विवस्त्र अवस्थेतील पुरूषाचा नशिराबादलगत मृतदेह आढळला
नशिराबाद : विवस्त्र अवस्थेतील 25 ते 30 वर्षीय तरुणाचा नशिराबाद शिवारात भादली रस्त्यालगत असलेल्या एका शेतातील विहिरीत आढळल्याची घटना गुरूवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ याप्रकरणी जयेश हरी धांडे यांनी दिलेल्या खबरीवरून नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नशिराबाद शिवारात भादली रस्त्यालगत असलेल्या रोहिदास लिलाधर चौधरी यांच्या शेतामधील विहिरीत 25 ते 30 वर्षीय अनोळखी पुरुषाचे विवस्त्र अवस्थेत पाण्यात मृतदेह तरंगताना आढळले. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे, प्रवीण ढाके, राजेंद्र साळुंखे, गुलाब माळी यांच्यासह सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. सुमारे दोन-तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही आत्महत्या की घातपात ? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहे.


