वांजोळा-मिरगव्हाण रस्त्यावर फायनान्सच्या वसुली कर्मचार्याला लूटले
दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एक लाख 56 हजारांची रोकड लांबवली
भुसावळ : वांजोळा-मिरगव्हाण रस्त्यावरून जाणार्या फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचार्यास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12.30 ते एक वाजेदरम्यान घडली. आरोपींनी वसुली कर्मचार्याकडील एक लाख 56 हजार 749 रुपयांची रोकड घेत मोंढाळ्याकडे पोबारा केला. भुसावळनजीक भर दिवसा पडलेल्या दरोड्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिड तास उलटूनही तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी न पोहोचल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला. बाजारपेठ पोलिसांनी मात्र धाव घेत नाकाबंदी लावली.
सापळा लावत आरोपींनी रोकड लूटली
समजलेल्या माहितीनुसार, भुसावळातील उज्जीवन फायनान्स कंपनीचे वसुली कर्मचारी उमेश रंगनाथ सपकाळ (35) हे वांजोळा भागातून वसुली करून परतत असताना शेताजवळ थांबलेल्या दोघा लुटारूंसह दुचाकीवरून आलेल्या एका लुटारूने सपकाळ यांना अडवत त्यांना चाकूचा धाक दाखवला तसेच त्यांच्या बॅगेतील सुमारे एक लाख 56 हजार 749 रुपयांची रोकड लांबवत पोबारा केला. याबाबतची माहिती तालुका पोलिसांना कळवल्यानंतरही सुमारे दिड तास उलटूनही पोलिस न पोहोचल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार म्हणाले की, आम्ही दीपनगरला आहोत, अद्याप आमच्यापर्यंत तक्रारदार पोहोचले नाहीत. दरम्यान, घटनेनंतर बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत झालेल्या घटनेबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.



