रावेरातील हद्दवाढीच्या भागात आता सुविधा


रावेर नगरपालिकेच्या सभेत हद्दवाढीच्या भागात नागरी सुविधा पुरवण्यास मंजुरी : शहर विकासाच्या 23 विषयांना अवघ्या 20 मिनिटात मंजुरी : डिसेंबरपासून कामांना होणार सुरुवात

रावेर : रावेर नगरपालिकेच्या सभेत हद्दवाढ झालेल्या वसाहतीचा डीपीआर, लाईट, गटार, पाणी, रस्त्यांसह अन्य सुविधा नागरीकांना देण्यास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. या सभेतील सुमारे 23 विषयांना 20 मिनिटात मंजुरी देऊन सभा आटोपण्यात आली. रावेर नगर पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर पालिकेची पहिलीच सभा घेण्यात आली. पालिका हद्दीबाहेरील वस्त्यांना सुविधा देण्यासाठी पालिका येत्या 1 डिसेंबरपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करणार असल्याचे नगराध्यक्ष दारा मोहोम्मद यांनी सभेत सांगितले. यामध्ये पाणी, वीज, स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून नंतर निीध प्राप्त झाल्यावर गटार, रस्ते व इतर सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

नगरसेवकांना माहिती मिळत नाही
मैला व्यवस्थापन केंद्राला किती निधी आला? पालिकेला त्याचा काय फायदा आहे? शासनाकडून आलेले पत्र आम्हाला का दाखविले जात नाही? असे प्रश्न उपस्थित करीत नगरसेवक प्रल्हाद महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. हद्दीमधील लाईटबाबात तक्रारी कर्मचार्‍यांना सांगितल्यास दुर्लक्ष केले जाते, लाईट उपलब्ध नसल्याचे दाखले देऊन आम्हाला लाईटासंदर्भात माहिती देत नसल्याचा आरोप नगरसेवक यशवंत दलाल यांनी सभेत केला. यावेळी मुख्यधिकारी रवींद्र लांडे यांनी दोन्ही नगरसेवकांच्या सूचनेची नोंद करण्यात आली.

यांची सभेला उपस्थिती
नगराध्यक्ष दारा मोहंमद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपनगराध्यक्ष सादीक शेख, नगरसेवक प्रल्हाद महाजन, असदुल्ला खा, अ‍ॅड.सुरज चौधरी, राजेंद्र महाजन, आसीफ मोहंमद, संगीता अग्रवाल, पार्वताबाई शिंदे, संगीता महाजन, शारदा चौधरी, रंजना गजरे, संगीता वाणी, हमीदाबी पठाण, ललिता बर्वे, शेख नुसरत, यास्मीन कलिम आदी उपस्थित होते. सभेचे कामकाज मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी पाहिले .

यापुढे माहिती पुरवली जाईल
शासनाकडून नुकतेच लाईट उपलब्ध झाले असून यापुढे तक्रार येताच तत्काळ ते पुरविले जातील तसेच मैला व्यवस्थापन प्रक्रियेची माहितीदेखील दिली जाईल तसेच नवीन हद्दीत आलेल्या वसाहत्यांमध्ये पुढील काही दिवसात पाणी, स्वच्छता, वीज यावर भर दिली जाईल व पालिकेचा डीपीआर तयार होत असून शासनाकडून निणी उपलब्ध होताच रस्ते, गटार आदी कामाला सुरुवात होणार असल्याचे पालिकेचे गटनेता आसीफ मोहम्मद म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !