भुसावळातील श्री विसर्जन मार्गावर भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामाला सुरवात
भुसावळ : शहराचे आमदार संजय सावकारे यांनी एकात्मिक उर्जा विकास योजनेतून मिरवणूक मार्गासाठी भुमिगत वीजवाहिनी मंजूर केली होती. या कामाला महावितरणने सोमवारपासून सुरवात केल्याने बाजारपेठेतील दुकानदारांनाही दिलासा मिळाला आहे. शहरातील मिरवणूक मार्गावरील वीज तारांच्या जाळ्यामुळे उंच गणेश मूर्तीमुळे अडथळा निर्माण होऊन ऐन मिरवणुकीच्या दरम्यानच वीजपुरवठा खंडीत राहत होता शिवाय अपघाताची भीतीदेखील अधिक होती.
ब्राह्मण संघापासून कामाला सुरुवात
आमदार संजय सावकारे यांनी तत्कालीन उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मिळवला मात्र पालिका प्रशासनाकडून ना हरकत मिळत नसल्याने हे काम थांबले होते. गेल्या तीन आठवड्यांपूर्वी पालिकेत आमदार सावकारे यांनी भेट देवून या संदर्भात कार्यकारी अभियंता पी.आर.घोरुडे व पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्यासोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढावा, महिन्याभरात काम सुरू करावे, अशा सूचना दिल्या होत्या. यानंतर आता सोमवारपासून मिरवणूक मार्गावरील भुमिगत वीज वाहिनीच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. न्यू एरीया वॉर्डातील ब्राह्मण संघापासून महावितरणने या कामाला सुरवात केली असून यामुळे शाश्वत वीजपुरवठा होणार आहे. या कामासाठी खोदकाम होईल, यामुळे काही काळ व्यापारी व दुकानदारांना त्रास होऊ शकतो, दुकानदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता पी.आर.घोरुडे यांनी केले आहे.



