लम्पी आजार : उपाययोजनांबाबत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आदेश
मुक्ताईनगर : गायीसह म्हशी या दुभत्या जनावरांवर आलेल्या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर लसीकरण व इतर दक्षतेबाबत जळगावसह बुलडाणा जिल्ह्यात संबंधित अधिकार्यांची तातडीची बैठक आयोजित करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी दिले आहेत. याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी मागणी केली होती.
खासदारांच्या पाठपुराव्याला आले यश
लम्पी त्वचा रोग भारतात मोठ्या प्रमाणावर आला असून यामुळे गाय- म्हशीसारखी जनावरे आजारी पडत आहेत तर अनेक ठिकाणी त्यांचा मृत्यूदेखील ओढवला आहे. हा आजार दुभत्या जनावरांवर सर्वाधिक दिसून येत असून त्यांची दूध देण्याची क्षमता कमी होत आहे. आजपावतो हजारो गुरे मृत्युमुखी पडली असून लाखो गुरांना या आजाराने ग्रासले असल्याने, लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर लसीकरण व इतर दक्षतेबाबत जळगावसह बुलडाणा जिल्ह्यात संबंधित अधिकार्यांची तातडीची बैठक आयोजित करण्याबाबत खासदार खडसे यांनी मंत्री पाटील यांना शनिवार, 13 ऑगस्ट रोजी पत्र लिहून मागणी केली होती.



