भुसावळात कल्याणच्या इसमाला नऊ लाखांच्या नकली नोटा देत 95 हजार गंडवले : दोघांविरोधात गुन्हा

दोघा भामट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा : सीसीटीव्हीत संशयीत कैद


Kalyan’s Isma in Bhusawal swindled 95 thousand by giving fake notes of 9 lakhs : Crime Against Both भुसावळ : मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज देण्याच्या निमित्ताने कल्याणच्या इसमाचा विश्वास संपादन करून भामट्यांनी मंगळवारी सायंकाळी 95 हजारांची रोकड शहरातील स्टेशन रोड परीसरातून लंपास केली तर नऊ लाखांच्या नकली नोटा दिल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्हीत एक संशयीत कैद झाला आहे.

चिल्ड्रन बँकेच्या नोटा देत ठगवले
कल्याण येथील मंगेश वाडेकर यांनी फेसबुकवर कर्जाबाबतची जाहिरात पाहिल्यानंतर संबंधितांनी त्यांच्याशी दोन महिन्यांपासून संपर्क साधला होता. दहा लाखांचे कर्ज मंजूर करण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपये कमिशन लागेल, असे सांगून संशयीतांनी वाडेकर यांना भुसावळात बोलावले होते. ठरल्यानुसार कल्याण वेस्ट येथील साई शरमन वाडेकर रोडवरील रहिवासी मंगेश गुलाबराव वाडेकर हे मुलासह कर्जाची रक्कम घेण्यास भुसावळातील रेल्वे स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मंगळवार, 30 ऑगस्ट रोजी बलेनो कारद्वारे आले होते. यावेळी संशयीत विकास म्हात्रे याने केवळ पाच हजारांच्या खर्‍या नोटा बॅगेत टाकून चिल्ड्रन बँकेच्या 500 दराच्या एकूण 1800 बनावट नोटा बॅगेत टाकून शिवाजी पुतळ्याजवळ वाडेकर यांना देत पळ काढला.

अशी झाली फसवणूक उघड
भुसावळ येथून नोटांची बॅग घेऊन सायंकाळी पाचला निघालेले वाडेकर हे सायंकाळी सात वाजता पारोळा येथे पोहोचले मात्र त्यांनी बँकेत नोटा भरणा करण्यासाठी दिल्या असता त्या चिल्ड्रन बँकेच्या असल्याचे समोर आले. यावेळी पारोळा पोलिसांना पाचारण करण्यात आले.

बाजारपेठ पोलिसात गुन्हा
घडला प्रकार वाडेकर यांनी कथन केल्यानंतर त्यांना भुसावळ बाजारपेठ पोलिसात पाठवल्यानंतर संशयीत विकास म्हात्रे व राजेश पाटील यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये करीत आहेत. दरम्यान, रेल्वे स्थानकाबाहेरील सीसीटीव्हीत चिल्ड्रन बँकेच्या नोटा देणारा संशयीत कैद झाला असून दुसर्‍याचा शोध सुरू करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !