भुसावळातील बँक ऑफ बडोदा बाहेरून 50 हजारांची रोकड लांबवली : मध्यप्रदेशातील चोरट्या महिलांना कारागृहाची हवा


भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील बँक ऑफ बडोदाजवळ दोन परप्रांतीय महिलांना बॅगेतून पन्नास हजारांची रोकड लांबवताना सतर्क नागरीकांना पकडून बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. अनिता संजय सिसोदिया (33, रा.कडीया, नरसिंगगड, जि.राजगड, मध्यप्रदेश) व ललिता शाका सिसोदिया (25, धुतकेडी, नरसिंगगड, जि.राजगड, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपी महिलांची नावे आहेत. दरम्यान, आरोपी महिलांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली.

बॅगेला ब्लेड मारताना महिला जाळ्यात
खडका येथील रहिवासी नरेंद्र पंडित भोळे हे ग्राहक सेवा केंद्र चालवतात. गुरुवार, 1 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजता त्यांनी बँक ऑफ बडोदा शाखेतून 50 हजारांची रोकड काढून बॅगेत टाकली व बँकेच्या गेटजवळ आल्यानंतर त्यांच्या बॅगेत अनिता व ललिता सिसोदिया या महिलांनी ब्लेड मारत 50 हजारांची रोकड अलगद काढून पळ काढण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच त्यांना पकडण्यात आले. बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. भोळे यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तपास निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक तेजस निंबाजी पारीसकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !