आईचे वर्षश्राद्ध अनाथांच्या आनंदाश्रमात


राऊत परीवाराचा उपक्रम : जागतिक अपंग दिनी प्रेरणादायी समाजकार्य !

यावल : कुटुंबातील व्यक्ती हरपल्यानंतर वर्षश्राद्ध हे आप्तेष्टांच्या उपस्थितीत साजरे करण्याची प्रथा असलीतरी या रुढी-परंपरेला फाटा देत साकळी, ता.यावल येथील माहेरवाशीण तसेच भुसावळ येथील रहिवाशी असलेल्या स्व.इंदूबाई राऊत यांचे प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राध्द) दिनानिमित्त त्यांच्या मुलांनी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधत अपंग व अनाथांच्या ‘आनंदाश्रमात’ वर्षश्राद्ध करीत समाजमन जिंकले आहे. राऊत कुंटूबियांच्या विचारांच्या पलिकडच्या प्रेरणादायी समाजकार्याची सर्वांनी अनुकरण करण्याची गरज आहे.

आश्रमाला बंगळी भेट
साकळी, ता.यावल येथील माहेरवाशीण असलेल्या इंदुबाई राऊत यांचे वरणगाव येथे सासर असून पती पोस्टमास्टर म्हणून भुसावळ येथे नोकरीला असल्याने इंदूबाई ह्या भुसावळ येथे गेल्या अनेक वर्षापासून येथे स्थायिक होत्या. वृद्धापकाळाने त्यांचे गततर्षी 3 डिसेंबर 2018 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुकेश ,तुषार व सचिन अशी तीन मुले, सुना, नातवंडे यांच्यासह माहेरातील भाऊ, बहिण असा परीवार होय. त्यांची मुले वेगवेगळ्या व्यवसायातून आपल्या कौटुंबिक प्रपंच सांभाळत, सर्वसामान्यपणे व सुखी-समाधानी जीवन जगत आहे. वर्षभरानंतर आपल्या मयत आईचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करण्यासाठी तिन्ही मुलांमध्ये विचारविनिमय सुरू असतांना सर्वात लहान सचिन राऊत यांने आईचे वर्षश्राद्ध अनाथ व निराधार व्यक्तींसोबत करायचे जेणेकरून आईच्या स्मरणार्थ आपल्या हातून सामाजिक कार्य सुद्धा होईल, असा प्रस्ताव मांडला. सचिनच्या प्रस्तावास दोघा मुलांनी सहमती दर्शवून सौखेडा (जळगाव) येथील केशव प्रतिष्ठान संचलित अनाथ- आनंदाश्रमात आईचे प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) करण्याचे ठरविले. त्यानुसार नुकतेच 3 रोजी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तिघा मुलांसह सर्व कुटुंबीयांनी मयत इंदुबाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर आश्रमातील आरती व भजनात सहभागी झाले. यानंतर राऊत कुटुंबीयांकडून जवळपास शंभर अनाथ व अपंग व्यक्तींना भरीत, कळण्याच्या पुर्‍या, गोडशिरा, कढ़ी या मेनूचे जेवण दिले तसेच या कुटूंबाने व सुजित शिंदे आणि मित्र परीवाराच्या सहकार्याने या आश्रमास लाकडी बंगळी सुद्धा भेट दिली. तत्पुर्वी त्यांनी घरी सुद्धा वर्षश्राध्दाचा विधी केला होता.

मानवतेच्या भावनेने भारावले वातावरण
यावेळी राऊत कुटुंबीयांसमवेत साकळी येथील सामाजिक कार्यकर्ते जितू वाघळे यांच्या परीवारासह, सगे-सोयरे, आप्तेष्ट मोठया संख्येने हजर होते. कार्यक्रमास्थळी सारे वातावरण मानवतेच्या भावनेने भारावून गेले. या त्यांच्या ‘वर्षश्राध्दातून… समाजकार्य’ संकल्पित कार्याचा समाजात एक चांगला संदेश गेला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !