चुंचाळ्यात आजपासून गैबनशहा बाबांचा दोन दिवसीय यात्रोत्सव


हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक : यात्रोत्सवात तडवी समाजातील उपवर मुला-मुलींचे जुळतात विवाह

यावल : तालुक्यातील चुंचाळे मंगळवार, 10 रोजी हजरत गैबनशहा बाबा यांच्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पुर्व संध्येला सोमवार, 9 रोजी समशेर लालखाँ तडवी यांच्या घरापासून ढोल ताश्याच्या गजरात वाजत-गाजत संदल मिरवणूक काढण्यात आली. हनुमान चौक, चव्हाण वाडा, धनगर वाडा, तडवी वाडा, मुख्य चौकांमधून सर्व पवित्र दर्ग्यावर चादर व शेरणी हिंदू मुस्लीम तडवी बांधवाच्या उपस्थितीत चादर चढविण्यात आली. मंगळवारी सकाळी चादर व शेरणी चढवण्यात येणार आहे. या दोन दिवसीय यात्रोत्सवात तडवी समाजातील उपवर मुला-मुलीचे विवाह जुळवितात.

दर्गा हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक
हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जाणार्‍या हजरत गैबनशहावली बाबांची अख्यायीका अशी आहे. शेकडो वर्षांपॅर्वी गावाबाहेरील एक उंच टेकडीवरून आवाज यायचा, या टेकडीमधून मला बाहेर काढा. त्या दिशेने गेले असता त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत अनोळखी व्यक्ती तिथे पडला होता व त्या अनोळखी व्यक्तीला पाणी पाजले असता त्यांनी मला टेकडीला पाच फेर्‍या मारण्यास सांगितल्या व नंतर तो व्यक्ती तेथून गुप्त झाला व काही वर्षांनी पुन्हा स्वप्नात येऊन सांगितले, तु मला पाणी पाजले तुला भविष्यात काहीच कमी पडणार नाही व माझे नाव हजरत गैबनशाह बाबा आहे. तेव्हापासून आजपर्यंत अविरत बाबांच्या नावाने यात्रोत्सव भरवण्यात येतो, असे येथील तडवी पंच कमेटीने सांगितले. सर्व हिंदू-मुस्लिम तडवी समाजाच्या ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणार्‍या बाबांच्या या दर्ग्यावर भाविकगण आपली दुःखे सांगून मन हलके करतात तर नवसही मानतात. यात्रेदरम्यान लहान मुलांसाठी विविध खेळणी, भांडी, पाळणे तसेच मिठाईचे दुकाने थाटण्यात आली आहेत.

कव्वालीचा मुकाबला रंगणार
यात्रेच्या दिवशी रात्री कव्वालीचा मुकाबल्याचे आयोजन करण्यात आले आहे. कव्वालसाहब आसीफ अजमेरी (भरुच गुजरात) तर कव्वालन सनमपरी (बर्‍हाणपूर) यांच्यात कव्वालीचा मुकाबदला रंगणार आहे. यात्रेला जळगाव जिल्ह्यातसह महाराष्ट्रातून भाविक येतात. यात्रोत्सवासाठी यावल पोलीस निरीक्षक रमाकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील तायडे, विकास सोनवणे, चुंचाळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धनसिंग राजपूत, पोलिस पाटील, गणेश पाटील आदींनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !