अवैध गुरांची वाहतूक करणार्‍यांचा भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या महिला कर्मचार्‍यावर हल्ला

भुसावळ बाजारपेठ पोलिसात दोघांविरोधात गुन्हा : तीन गोर्‍ह्यांचा मृत्यू


Illegal cattle transporters attack female employee of Bhusawal City Traffic Branch भुसावळ : अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणार्‍या पिकअप वाहनाने शहर वाहतूक शाखेतील महिला कर्मचार्‍याच्या दुचाकीला धक्का देत महिला कर्मचार्‍याशी अरेरावी करीत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना रविवार, 18 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, महिला कर्मचार्‍याने वाहनाचा पाठलाग करीत पिकअप वाहन जप्त केले असून त्यातील तीन गोर्‍हे मृत स्थितीत आढळले आहेत.

वाहतूक कर्मचार्‍याशी केली अरेरावी
वाहतूक शाखेच्या कर्मचारी विजया पंढरीनाथ सपकाळे (34) या रविवारी पांडुरंग टॉकीज चौकात कर्तव्यावर असताना अशोक लेलॅण्ड कंपनीच्या पिकअपमधून गुरांची वाहतूक होत असल्याचे दिसताच त्यांनी वाहनाला थांबण्याचा इशारा केला मात्र वाहन चालकाने सपकाळे यांच्या वाहनाला धडक दिल्यानंतर सपकाळे यांना वाहनाचा तीन किलोमीटरपर्यंत पाठलाग केला व वरणगाव रोडवरील लाल मंदिराजवळ वाहन पकडले. संशयीत चालकाकडे कागदपत्रे मागितल्यानंतर चालकासह क्लीनरने दादागिरी करीत हुज्जत घातली व धक्काबुक्की करीत पळ काढला. ही बाब सहा.निरीक्षक स्वप्नील नाईक यांना सांगितल्यानंतर त्यांनी धाव घेतली.



सहा लाखांचे वाहन जप्त : गुरांची सुटका
पोलिसांनी सहा लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन जप्त केले असून त्यातील चार गुरांची सुटका केली आहे तर तीन गोर्‍ह्यांचा निर्दयी वाहतूकीमुळे मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी विजया सपकाळे यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चालकासह क्लीनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक गणेश मुर्‍हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !