भुसावळात घरगुती ग्राहकाला एक लाख 87 हजारांचे वीज बिल

रीडिंगमध्ये सुधारणा झाल्याचा महावितरणचा दावा हास्यास्पद


Electricity bill of one lakh 87 thousand to a domestic customer in Bhusawal भुसावळ : शहरातील वीज ग्राहकांच्या घरातील वीज मीटरचे चुकीचे रिडिंग घेतले जात असून वीज बिलांच्या वाटपात दिरंगाई होत असल्याची बाब समोर आली आहे. मुदत संपल्यानंतर ग्राहकांना वीज बिलांचे वाटप केले जात असल्याची तक्रार शहरातील ग्राहकांनी केली आहे. प्रत्येक महिन्यात चुकीचे रीडींग देऊन ग्राहकांना मनस्ताप देण्याचा प्रकार सुरूच असल्याने चुकीचे मीटर रीडींग देणार्‍या एजन्सीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरीकांतर्फे होत आहे. चुकीच्या देयकांमुळे ग्राहक विज बिल भरणा करीत नाही.

चुकीच्या बिलांमुळे ग्राहकांना मानसिक त्रास
शहरातील जळगाव रोड परीसरात एका वीज मीटरवर (ग्राहक क्रं: 117755006852) सध्या 6285 रिडिंग दिसत असताना त्यांना डिसेंबर महिन्याच्या आलेल्या बिलात चालूरीडिंग 6617 आलेले आहे. म्हणजेच चक्क 332 अतिरिक्त रिडींग दिले. जामनेर रोड परीसरातही (ग्राहक क्रं: 117754089703) 4498 ऐवजी 5124 रीडींग आलेले आहे. 627 अतिरिक्त रीडींग देण्यात आले. साने गुरुजी नगरात (ग्राहक क्रं: 117750235683) 2267 रीडींग असतांना 2591 रीडींग देण्यात आले आहे तर काही ग्राहकांना रीडिंग न घेताच बिले देण्यात आली. खडका रोड विभागात एकाच ग्राहकाला (ग्राहक क्रं:117750287306) तब्बल 10 हजार 579 रीडिंगचे 1,87,750 रुपयांचे देयक देण्यात आले तसेच दुसर्‍या एका ग्राहकाला (ग्राहक क्रं: 117750231386) 4823 रीडिंगचे 84 हजार 520 रुपयांचे देयक देण्यात आले असून या सर्व ग्राहकांना वीज देयक पाहून मानसिक त्रास होऊ लागला आहे.



रीडिंगमध्ये सुधारणा झाल्याचा महावितरणचा दावा फोल
अचूक बिलिंगसाठी 100 टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे. त्यासाठी सुरू असलेल्या उपायांमुळे गेल्या दोन महिन्यांत बिलिंग व रीडिंगमध्ये सुधारणा झाली आहे. तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे, असे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले होते, मात्र भुसावळात रिडिंगमध्ये सुधारणा झालीच नाही, ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढला आहे, महावितरणचा दावा फोल ठरला असल्याचे मत प्रा.धीरज पाटील यांनी व्यक्त केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !