आत्मविश्वास असेल तर यश आपलेच : सोनू मांडे
भुसावळ : विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त गुण ओळखून तो विकसीसत करण्यासाठी स्वतःच प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी आत्मविश्वास व सततचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. आत्मविश्वास असेल तर कोणत्याही क्षेत्रात आपल्यातील उणीवांवर व अडचणींवर मात करून आपण हवे ते यश संपादन करू शकतो, असे मत संस्थाध्यक्ष सोनू मांडे यांनी व्यक्त केले. शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यांची स्पर्धेप्रसंगी उपस्थिती
स्पर्धेचे उद्घाटन शाळेचा माजी विद्यार्थी व बँकॉक येथे झालेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेतील कांस्यपदक विजेता खेळाडू खेमचंद पाटील यांनी क्रीडा मशाल प्रज्वलित करून तसेच शक्तीची देवता हनुमानाच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून केले. कार्यक्रमाला समाजसेवक पिंटू कोठारी, संस्था सदस्य श्रीधर खणके, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे, पर्यवेक्षक नारायण घोडके उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय वाघ तर प्रास्ताविक क्रीडा शिक्षक राजू कुलकर्णी यांनी केले. उपस्थितांचा परीचय रवींद्र खरादे यांनी दिला. याप्रसंगी दहावीचा विद्यार्थी अर्जुन मांडे याने क्रीडा प्रतिज्ञा सादर केली. आभार सुधाकर सपकाळे यांनी मानले.
