वाढदिवसाच्या पार्टीत धक्का लागल्याचे निमित्त बेतले जीवावर
The excuse of being a jerk at the birthday party came to life औरंगाबाद : वाढदिवसाच्या पार्टीत नाचताना धक्का लागल्याने सय्यद माजिद सय्यद पाशा (35, रा.गल्ली क्रमांक 6, किराडपुरा) या तरुणाचा खून झाल्याची घटना शहरात बुधवारी रात्री घडली. खुनातील संशयीत पसार झाले असून त्यातील दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.
धक्का लागल्याचे निमित्त
माजीद सय्यद पाशा आणि आरोपी जवळचे नातेवाईक असून बुधवारी रात्री किराडपुरा येथे एका पाच वर्षीय चिमुकल्याचा वाढदिवस असल्याने पार्टीत सर्व नातेवाईक एकत्र जमले. केक कापल्यावर नाचगाणे सुरू असताना माजीदचा धक्का आरोपींना लागल्याने वाद सुरू झाला व संशयीतांनी मारहाण केल्याने व धारदार शस्त्राने हल्ला केल्याने माजीदचा मृत्यू ओढवला.


आरोपींनी पळ काढला
सुरूवातीला झालेल्या वादात नातेवाईकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता मात्र काही वेळाने आरोपी हत्यारासह परत आले व त्यांनी माजीद आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर जोरदार हल्ला केला. यात माजीद आणि इतर नातेवाईक गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. दरम्यान, माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून माजिद सय्यद पाशा यास मृत घोषित केले. तर आणखी तिघांवर उपचार सुरू आहेत.
