पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण : कजगावच्या तरुणाचा अपघाती मृत्यू
Dream of becoming a police officer unfulfilled: Accidental death of Kajgaon youth कजगाव : पोलीस दलात रूजू होवून देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून व्यायामासाठी निघालेल्या कजगावातील तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे 5.45 वाजता कजगाव येथे घडली. रोहित अशोक मराठे (19) असे मयत तरुणाचे नाव आहे. शवविच्छेदनानंतर मृत तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आई-वडिलांनी फोडलेला टाहो मन हेलावणारा होता.
व्यायामासाठी निघाल्यानंतर गाठले मृत्यूने
रोहित मराठे हा भडगाव येथील न्यू इंग्लिश शाळेत 12 वीत शिक्षण घेत होता. बारावीनंतर पोलीस बनायचे स्वप्न उराशी बाळगत रोहितने रोज मित्रांबरोबर व्यायाम सुरू केला होता. सोमवारी पहाटे साडेपाच वाजता तो मित्रांसोबत व्यायामासाठी निघाला असता कजगावनजीकच्या पेट्रोलपंपासमोरच चाळीसगावकडून भडगावकडे जाणार्या अज्ञात वाहनाने त्याला उडवले. तो खाली कोसळताच या भागातच फिरण्यासाठी आलेले दादाभाऊ पाटील, वैभव बोरसे, प्रमोद पवार, अशोक पाटील, रवी मालचे यांनी तत्काळ रुग्णवाहिका मागवली आणि रोहितला उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.






आई-वडिलांनी फोडला टाहो
रोहित हा अभ्यासात हुशार होता शिवाय त्याचा भाऊ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून बहिण विवाहित आहे. आई-वडील शेती करतात. चाळीसगाव येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आई-वडिलांनी मन हेलावणारा आक्रोश केल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले.


