ट्रॅपचा संशय आल्याने खंबाळे तलाठ्याने स्वीकारली नाही लाच मात्र धुळे एसीबीने अहवाल येताच आवळल्या मुसक्या


Bribe demanded : Khambale Talathi Dhule in ACB net धुळे : शेतजमिनीच्या सातबारा उतार्‍यावर वारसाचे नाव लावण्यासाठी तडजोडीअंती सहा हजारांची मागणी शिरपूर तालुक्यातील खंबाळे येथील तलाठी सुन्या पायल्या कोकणी यांनी केली होती. याबाबत धुळे एसीबीकेड तक्रार केल्यानंतर सापळाही रचण्यात आला मात्र ट्रॅपचा संशय आल्याने कोकणी यांनी लाच स्वीकारली नव्हती. लाच मागणीचा अहवाल प्राप्त झाल्याने मंगळवारी त्यांना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
खंबाळे, ता.शिरपूर येथील तक्रारदाराच्या वडीलांचे नावे मौजे खंबाळे येथे गट नं.44/2अ अशी शेत जमीन आहे. तक्रारदार यांचे वडील 2017 मधे मयत झाल्यानंतर त्यांच्या नावावर असलेल्या शेत जमिनीस काही कारणास्तव वारस लावता आले नाही मात्र शेतजमिनीच्या 7/12 उतार्‍यावर वारस लावण्याकरीता त्यांनी खंबाळे येथील तलाठी सुर्‍या कोकणी यांची भेट घेतल्यानंतर कोकणी यांनी तक्रारदार यांना वारस लावण्याच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज व सात हजार रुपये लाचेची मागणी केली व त्यात तडजोड होवून सहा हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर धुळे एसीबीकडे 18 जानेवारी रोजी तक्रार नोंदवण्यात आली. ट्रॅपचा संशय आल्याने कोकणी यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरून शिरपूरच्या दिशेने काढता पाय घेतला होता. दरम्यान, एसीबीला लाच मागणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वरीष्ठांच्या आदेशान्वये मंगळवारी त्यांना अटक करण्यात आली व शिरपूर तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.


कॉपी करू नका.