धुळे तालुका पोलिसांची मोठी कामगिरी : जबरी लुटीतील कुख्यात आरोपीसह दोघे जाळ्यात

75 हजारांची रोकड व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त : तिसर्‍या संशयीताचा कसून शोध


Major Breakthrough for Dhule Taluka Police: Two Arrested, Including Notorious Robbery Suspect धुळे (12 मे 2026) : धुळ्याजवळील फागणेजवळ शतपावली करताना अनोळखी तिघांनी एकाचे अपहरण करीत त्यांच्याकडील मोबाईलसह खात्यातून एक लाख परस्पर वर्ग केले होते. जबरी लुट प्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल होताच यंत्रणेने चक्रे फिरवत धुळ्यातील दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या तर तिसर्‍या साथीदाराचा शोध सुरू केला आहे. एक आरोपी अट्टल असून त्याच्याविरोधात तब्बल 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपींकडून गुन्ह्यात लुटलेल्या एक लाखांपैकी 75 हजारांची रोकड व अन्य दोन वाहने मिळून एक लाख 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

असे आहे लूट प्रकरण
4 मे 2026 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अतुल दगडू पाटील हे फागणे गावातील शनि मंदिराजवळ शतपावली करत असताना दोन दुचाकींवर आलेल्या अनोळखी इसमांनी त्यांना गाठले. चहाची टपरी कुठे आहे, असे विचारण्याचा बहाणा करीत पाटील यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून वरखेडी फाटा येथे नेले. तिथे त्यांना शिविगाळ व दमदाटी करत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि ‘फोन पे’ द्वारे बँक खात्यातून एक लाख रुपये वर्ग करीत चोरटे पसार झाले होते.




दोन आरोपींना अटक
धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तपासाचे निर्देश दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चेतन गवन देसले (23, भुजल कॉलनी, देवपूर, धुळे) व करण दगडू मोरे (26, रा.आरती कॉलनी, देवपूर, धुळे) यांना अटक करण्यात आली तर अन्य साथीदार निष्पन्न झाला असून त्याचा शोध सध्या सुरू आहे. दोन्ही आरोपींकडून 75 हजारांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली शाईन व होंडा अ‍ॅक्टिव्हा मिळून एक लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी करण दगडू मोरे हा सराईत गुन्हेगार असून तच्याविरोधात तब्बल 10 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, उपनिरीक्षक प्रशांत राठोड, उपनिरीक्षक कैलास माळी, अंमलदार उमेश पवार, गजेंद्र मुंडे, प्रतीक देसले, राजू पावरा आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !