Brutal killing of youth in Dhula धुळ्यात तरुणाची निर्घृण हत्या
Brutal killing of youth in Dhula धुळे : शहराजवळील मोहाडी उपनगराजवळील एका शेतात 30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सतीश बापू मिस्तरी (30, नित्यानंद सोसायटी, मोहाडी उपनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पहाटे उघडकीस आली घटना
मोहाडी पोलिस ठाणे हद्दीतील एका शेतात गुरुवारी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाल्यानंतर मोहाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह कर्मचार्यांनी धाव घेत पाहणी केली. तरुणाची ओळख पटू नये यासाठी त्याच्या चेहर्यावर पूर्णपणे दगडांना मारा करण्यात आला होता मात्र तरुणाच्या हातावर नाव गोंदलेले असल्याने त्यावरून त्याची ओळख पटल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला आहे. तरुणाच्या हत्येचे स्पष्ट कारण समोर आले नसलेतरी विविध बाजूंनी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. तरुणाच्या परीचयातील काहींची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री तरुण काही मित्रांसोबत पार्टीसाठी शेतात आल्याचीदेखील चर्चा असून त्यादृष्टीनेही पोलिसांकडून माहिती काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

