गांजा असल्याचे ठगवून जळगावात सेल्समनला तोतया पोलिसाकडून 28 हजारांचा गंडा
A salesman in Jalgaon was extorted from the police for 28,000 by pretending to be ganja जळगाव : तुमच्याकडे गांजा असल्याचा संशय असून मी पोलिस असल्याने तपासणी करावी लागेल, असे सांगत बोलण्यात गुंतवून 63 वर्षीय सेल्समनला 28 हजारांचा गंडा तोतया पोलिसाने घातल्याची घटना जैन पेट्रोल पंप, आकाशवाणीजवळ शनिवारी दुपारी चार वाजता घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तोतया पोलिसाविरोधात गुन्हा
रघुनाथ बाबुराव अंबुसकर (63, रा.पिंप्राळा, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्यास असून शहरातील ओम डिस्ट्रीब्युटर्स येथे सेल्समन म्हणून काम करतात. शनिवार, 1 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील जैन पेट्रोल पंपासमोरून पायी जात असताना एक अनोळखी व्यक्ती भेटला. त्याने आपण पोलिस असून तुमच्याकडे गांजा असल्याचा संशय असल्याने झडती घ्यायची आहे म्हणून वृद्धाकडील 18 हजारांची रोकड तसेच त्यांच्या हातातील 10 हजाराची 5 ग्रॅमची अंगठी असा एकूण 28 हजार रुपयांचा ऐवज बोलण्यात गुंतवत लांबवला. रघुनाथ आंबुसकर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर शनिवारी रात्री अज्ञाताविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार मनोज पवार करीत आहे.
