यावल तालुक्यात माथेफिरूने केळी घडांची केली नासधूस : 50 हजारांचे नुकसान
Mathefiru destroyed banana bunches in Yaval taluka : loss of 50 thousand यावल : माथेफिरूने शेतकर्याच्या शेतातील केळी घड कापून फेकल्याचा संतापजनक प्रकार शहरातील जुन्या कोरपावली रस्त्यावर सोमवारी सकाळी निर्दशनास आला. या घटनेत शेतकर्याचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले. शेतकर्याने पीक संरक्षण सोसायटी व यावल पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
माथेफिरूविरोधात कारवाईची मागणी
यावल शहरातून सूतगिरणी रस्त्याकडून जुना कोरपावली रस्ता असून तेथे यावल शहरातील शेतकरी अर्जुन नारायण बारी यांचे शेत आहे. त्यांच्या शेत गट क्रमांक 1958/1 मध्ये त्यांनी केळीची लागवड केली असून केळी पीक आता कापणी योग्य झाल्यानंतर सोमवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर अज्ञात माथेफिरूने त्यांच्या शेतातील केळीचे सुमारे 60 घड कापून फेकून नासधूस केल्याचा प्रकार दिसून आला. याबाबत शेतकरी अर्जुन बारी यांनी यावल पीक संरक्षण सोसायटी तसेच यावल पोलिसांकडे तक्रार दिली. पीक संरक्षण सोसायटीच्या वतीने या ठिकाणी जाऊन दिलीप भास्कर बारी, संजय कालिदास बारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
