धरणगाव तालुका हादरला : चारीत्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले


Dharangaon taluka shaken : Wife was set on fire by pouring petrol on suspicion of character धरणगाव : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत संतप्त पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना तालुक्यातील हिंगोणे बु.॥ येथे सोमवार, 3 रोजी दुपारी अडीच वाजता घडली. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत विवाहिता मीराबाई संतोष भील (55) यांचा मृत्यू ओढवला तर आरोपी पती संतोष आखाडू भील हा देखील या घटनेत भाजला असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चारीत्र्याच्या संशयातून घटना
सूत्रांच्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बु.॥ येथे संतोष व मीराबाई हे भिलाटी भागात वास्तव्यास होते. संतोष भील यास पत्नी मीराबाई हिच्या चारीत्र्यावर संशय असल्याने दोघांमध्ये नेहमीच भांडण घडत होते. सोमवारी दुपारी अडीच वाजता याच कारणातून दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर मीराबाई या बकरी बांधण्याच्या वाड्यात झोपल्या असतानाच आरोपीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत त्यांचा मृत्यू ओढवला तर संतोष हा देखील भाजला गेला. गावात घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. धरणगाव पोलिसांना माहिती कळवल्यानंतर यंत्रणेने धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला तर आरोपीला उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले. या प्रकरणी मयताचा मुलगा शिवदास संतोष भील (31) याच्या तक्रारीवरून संतोष भिल याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !