विदगावात दरोड्याचे संभाषण ऐकणार्या तरुणावर चौघांचा हल्ला
जळगाव : जळगाव तालुक्यातील विदगाव येथे अंडा बिर्याणीच्या गाडीवर जुन्या दरोड्याच्या संदर्भात संभाषण करताना तक्रारदार आल्यानंतर जुन्या वादातून त्यास शिविगाळ करीत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना साई बिर्याणीच्या गाडीवर रविवारी दुपारी दोन वाजता घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
चेतन भानूदास कोळी (33, विदगाव, ता.जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. चेतन कोळी हा रविवार, 9 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गावातील अंडा बिर्याणी गाडीवर असतांना संशयित भगवान भाऊलाल कोळी, प्रकाश गोपीनाथ कोळी, पवन श्रावण कोळी आणि बापू भगवान बाविस्कर (सर्व रा.विदगाव) हे मागील दरोड्याच्या पैशांसंदर्भात बोलत असताना अचानकपणे चौघांनी चेतन कोळी याला शिविगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. यातील भगवान कोळी याने हाताील लोखंडी रॉड चेतनच्या डोक्यात मारला तर इतरांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी चेतन कोळी याने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी भगवान भाऊलाल कोळी, प्रकाश गोपीनाथ कोळी, पवन श्रावण कोळी आणि बापू भगवान बाविस्कर (रा.विदगाव, ता.जळगाव) या चौघांवर जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.
