रावेर शहरात वीज चोरी : तीन जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल
Crime against three electricity thieves in Raver यावल : रावेर येथील विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शहरात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. शहरातील शंकर नगर भागात तपासणी करतांना तीन जण वीज चोरी करतांना आढळल्याने त्यांना दंडाची नोटीस देवूनही दंड भरण्यात न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा
रावेर येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांच्यासह वीज तंत्रज्ञ अमोल हिवरे, भिका साळुंखे, वासुदेव चौधरी, कमलेश माळी या पथकाने शंकर नगर भागात वीज चोरांविरुद्ध धडक मोहिम राबवली. यामध्ये शेख परवेज शेख लुकमान या वीज धारकाच्या मीटरमध्ये शेख लुकमान शेख रहेमान यांनी फेरफार केल्याचे आढळून आल्याने त्यांना 11 हजार 573 रुपये दंड करण्यात आला तसेच सय्यद जब्बार सय्यद हुसेन यांच्या मीटरमध्ये देखील फेरफार आढळल्याने त्यांना नऊ हजार 627 रुपये दंड करण्यात आला आणि शेख शाहरुख शेख फारूक यांच्या नावे असलेल्या मीटरमध्ये शेख फारुक शेख कासम यांनी फेरफार केलेली दिसून आल्याने त्यांना सात हजार 97 रूपये दंड करण्यात आला. वेळेत दंड अदा केला नाही म्हणून या तिघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
