जळगावात साडेपाच लाखांची घरफोडी : मोलकरणीसह पतीला अटक

दोघा आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी : दहा तोळे सोन्याची रीकव्हरी


House burglary worth five and a half lakhs in Jalgaon : Husband arrested along with maid जळगाव : शहरातील राजमालती नगरात काम करणार्‍या मोलकरणीने पाच लाख 32 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना शनिवार, 1 एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात मोलकरणीसह तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. संशयीतांकडून आतापर्यंत दहा तोळे सोन्याची रीकव्हरी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोलकरणीनेच मारला सोन्याच्या दागिण्यांवर डल्ला
शहरातील राजमालती नगरात सुनीता नरेंद्र मोरे (48) या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती सेवानिवृत्त असून मुलगा हिमांशू हा रेल्वेत नोकरीला आहे. सुनीता यांना दागिण्यांची आवड असल्याने त्यांनी चार लाख रुपयांचे 10 तोळ्याचे मंगळसूत्र, 40 हजार रुपयांचे एक तोळ्याचे कानातील टोंगल, 12 हजार रुपयांचे तीन ग्रॅमचे टॉप्स, 80 हजार रुपयांच्या 6 सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज बनवून पाच लाख 32 हजारांचे एकत्रीत सोन्याचे दागिणे घरातील पितळी डब्यात ठेवले होते. 1 एप्रिल रोजी मोरे यांनी दागिण्यांचा डबा पाहिल्यानंतर त्यांना दागिणे आढळले नसल्याने त्यांचा संशय मोलकरणीवर गेला मात्र चौकशीअंती मोलकरणीने कानावर हात ठेवले. या प्रकरणी रविवार, 16 रोजी मोरे कुटूंबियांनी मोलकरणीविरूध्द शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स्वाती किशोर कांबळे (राजमालती नगर, जळगाव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोलकरीणच निघाली चोर
शहर पोलिसांनी तपास चक्रे फिरवल्यानंतर स्वाती कांबळे हिला ताब्यात घेताच तिने पोपटासारखी चोरीची कबुली दिली. आपला पती किशोर कांबळेदेखील चोरीत सहभागी असल्याची कबुली स्वातीने दिल्यानंतर दाम्पत्यास रविवारी अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चौकशीत संशयीतांनी दहा तोळे सोने काढून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !