गणपती नगरात शॉर्ट सर्कीटमुळे किराणा दुकानाला आग
Fire at a grocery shop in Jalgaon: loss of lakhs जळगाव : शहरातील गणपती नगरात रविवारी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे किराणा दुकानाला आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या बंब दाखल झाला. या बंबाने आग आटोक्यात आणली मात्र तो पर्यंत मोठे नुकसान झाले.
आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान
शहरातील लाडवंजारी कार्यालयामागील बाजूस असलेल्या गणपती नगरात खिवसरा यांचे नेहा किरणा जनरल स्टोअर नावाचे दुकान आहे. रविवारी सकाळच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे खिवसरा यांच्या दुकानाला अचानक आग लागली. ही घटना परीसरातील नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन विभागाला माहिती कळवली. अग्निशमन विभागाचे वाहन चालक युसूफ पटेल, फायरमन पन्नालाल सोनवणे, नितीन बारी, वाहन चालक नंदकिशोर खडके, फायरमन संतोष पाटील, मोहन भाकरे यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बंबाद्वारे पाण्याचा मारा करुन ही आग आटोक्यात आणली. आगीत खिवसरा यांच्या दुकानातील माल पूर्णपणे जळून खाक झाला असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


