12 thousand bribe : Kotwal along with punter arrested by ACB भुसावळात 12 हजारांची लाच घेताना कोतवालासह पंटर जाळ्यात


12 thousand bribe : Kotwal along with punter arrested by ACB भुसावळ : शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उतार्‍यावर शेतकर्‍याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ सजाचे कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे (54, रा.भुसावळ) व खाजगी कर्मचारी हरी देविदास ससाणे (44, रा.आंबेडकर नगर, भुसावळ) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. ही कारवाई भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली. लाचेच्या कारवाईनंतर तहसीलमधील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

असे आहे नेमके लाच प्रकरण
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील 34 वर्षीय तक्रारदाराने 2022 मध्ये भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथे स्वतःच्या नावाने दोन एकर शेतजमिनीची खरेदी केली आहे. या शेतजमिनीच्या सातबारा उतार्‍यावर तक्रादाराचे नाव लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय कुर्‍हेपानाचे येथे प्रकरण सादर केले. या प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगीता पाटील यांनी काही त्रृटी काढल्या होत्या व भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटण्यास  सांगितले  होते. त्याप्रमाणे तक्रारदार हे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटल्यानंतर त्यांनी तक्रारदाराला मंडळाधिकारी यांच्याकडून सातबारा उतार्‍यावर नाव लावून देण्याचे काम करून देतो मात्र त्यासाठी 15 हजारांची लाचेची मागणी केली मात्र तक्रारदाराने रकमेत तडजोड करीत 12 हजार रुपये देण्याचे कबुल केल्यानंतर मंगळवारी जळगाव एसीबीकडे लेखी तक्रार नोंदवण्यात आली.

पंटराकडे लाचेचा इशारा अन् सापळा झाला यशस्वी
कोतवाल धांडे यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम घेवून तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी एक वाजता बोलावल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तक्रारदार तहसीलच्या आवारात आल्यानंतर धांडे यांनी खाजगी पंटर हरी ससाणे यांच्याकडे बोटानेच लाच देण्याचा इशारा केल्यानंतर तक्रारदाराने लाचेची रक्कम ससाणे यांच्याकडे दिली व लाच स्वीकारताच ससाणे व नंतर कोतवाल धांडे यांना एसीबीच्या पथकाने अटक केली. एकाचवेळी झालेल्या या कारवाईनंतर तहसील कार्यालयातील लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात दोघा लाचखोरांविरोधात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

मंडळाधिकार्‍यांच्या वाढल्या अडचणी
कुर्‍हेपानाचे येथील मंडळाधिकारी योगीता पाटील यांच्या लाच प्रकरणातील कारवाईनंतर अडचणी वाढल्या आहेत. सातबारा उतार्‍यावर काम करून देण्यासाठी कोतवालाने भलेही आश्वासन दिले असलेतरी या प्रकारात साखळी असल्याची शक्यता एसीबीला आहे. योगीता पाटील यांचीदेखील कसून चौकशी केली जाईल शिवाय तक्रारदार व अटकेतील संशयीताचे जाब-जवाब नोंदवल्यानंतर मंडळाधिकारी त्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, असे पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी सांगितले. मूळात कोतवालाला सातबारा उतारा देण्याचे अधिकार नाहीत त्यामुळे मंडळाधिकार्‍यांनी कोतवालाला भेटण्यास का सांगितले? हादेखील प्रश्न आहे.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, प्रदीप पोळ, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक नार्दन चौधरी, नाईक किशोर महाजन, नाईक सुनील पाटील. नाईक राकेश दुसाने, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !