बोरखेडा येथे दोन गट भिडले : धरणगाव पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे
A scuffle broke out in Borkheda due to a minor dispute : Crimes in Dharangaon police against each other धरणगाव : धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथे दोन गटात किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवार, 18 रोजी 9 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन्ही गटातील एकूण सहा जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
परस्परविरोधात गुन्हे दाखल
पहिली फिर्याद समुदाय आरोग्य अधिकारी श्रीकांत दिलीप पाटील (बोरखेडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मंगळवार, 18 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील दादरचा चारा चोरीबाबत शेजारील शेतीकरी ज्ञानेश्वर उर्फ पंकज विश्वानाथ पाटील यांना केली असता याचा त्यांना राग आल्यामुळे त्यांनी तसेच त्यांच्या सोबतच्या गजानन कैलास पाटील, आकाश रुपसिंग पाटील अशांनी दारुच्या नशेत अनाधिकारपणे घरात घुसून श्रीकांत पाटील आणि त्यांच्या वडील व काकांना तसेच घरातील महिलांना शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देत मारण्यासाठी अंगावर धावून आले. एवढेच नव्हे तर ज्ञानेश्वर उर्फ पंकज पाटील व आकाश पाटील यांनी झटापटीत श्रीकांत पाटील यांच्या हातातील 50 हजार रुपये किंमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेऊन गेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तपास राजू पाटील करीत आहेत.
दुसर्या गटानेही दिली तक्रार
दुसरी फिर्याद गजानन कैलास पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार, त्यांचा शालक पंकज विश्वनाथ पाटील (रा.बोरखेडा, ता.धरणगाव) याने गुरांचा चारा कापून आणल्याच्या संशयावरुन गावातील डॉ.श्रीकांत पाटील, त्याचे वडील दिलीप पाटील, त्याचे काका कांतीलाल पाटील (सर्व रा.बोरखेडा) यांनी मारहाण करुन त्याच्या हातावर, छातीवर मारुन दुखापती केली तसेच गजानन पाटील हे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले असता डॉ.श्रीकांत पाटील याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची 10 ग्रॅम वजनाची चैन जबरीने तोडून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास नाईक दीपक पाटील करीत आहेत.


