अमळनेर तालुका दुहेरी खुनानंतर हादरला : आरोपींची धरपकड


Amalner taluka shaken after double murder : Accused arrested  अमळनेर : अमळनेर शहरासह तालुक्यातील सावखेडा येथे झालेल्या दुहेरी खुनानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत अमळनेरात स्पीकरचा आवाज कमी करण्यावरून वाद उद्भवल्याने चाकूचे वार करीत तरुणाची हत्या करण्यात आली तर दुसर्‍या घटनेत अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे मारहाण झाल्याचा राग डोक्यात ठेवून तरुणाची कुर्‍हाडीने वार करून हत्या करण्यात आली. दोन्ही धक्कादायक घटना सोमवार, 24 एप्रिल रोजी रात्री घडल्या. पोलिसांनी तपासचक्रे फिरवत दोन्ही खुनातील सहा संशयित आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत.

सावखेड्यात मारहाणीच्या रागातून हत्या
अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे नाना मंगलसिंग बारेला (21) यांनी डेबूजी सुरसिंग बारेला (21, ह.मू.सावखेडा, मूळ रा.किरमोहा, ता.सेंधवा, मध्यप्रदेश) यास सोमवार, 24 रोजी सायंकाळी काठीने मारहाण केली होती व मारहाण झाल्याचा राग अनावर झाल्याने डेबूजी याने सोमवार, 24 रोजी रात्री 12 वाजेनंतर कुर्‍हाड घेवून रतन मल्लू वैदू याच्या घराजवळ नाना बारेला याच्यावर कुर्‍हाडीने हल्ला चढवला. या हल्ल्यात नाना याचा जागीच मृत्यू ओढवला. खुनाची माहिती कळताच प्रभारी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव, राहुल पाटील यांना सावखेडा रवाना केल्याने पसार होण्याच्या तयारीतील डेबूजी याला अटक करण्यात आली. खून प्रकरणी दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत.

अमळनेरात आवाजाचा वाद बेतला जीवावर
दुसर्‍या घटनेत अमळनेर शहरातील दाजीबा नगरात राहुल नाना सरोदे, रोहित चेतन सरोदे, कृष्णा सरोदे, अर्जुन पारधी हे सोमवारी रात्री गच्चीवर जोरात गाणे वाजवत असताना दीपक राजू भिल बोलायला गेल्यानंतर त्यास संशयीतांनी मारहाण केली व ही बाब त्याने घरी भाऊ अक्षय राजू भिल (22) याला सांगताच त्याने जाब विचारला मात्र त्याचा राग येवून संशयित रोहित चेतन सरोदे याने अक्षयच्या पोटात चाकू मारला तर दीपक भिल यास रोहितच्या आई नीताने बांबू मारला तर राहुलच्या आई आरतीने लोखंडी रॉड मारून जखमी केले. हल्ल्यात जखमी झालेल्या अक्षयला उपचारार्थ धुळे हलवण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू ओढवला तर भाऊ दीपक भिल हा गंभीर जखमी आहे.

अमळनेर खून प्रकरणी पाच आरोपींना अटक
अमळनेरातील तरुणाच्या खून प्रकरणी संशयित रोहित चेतन सरोदे (19), राहुल नाना सरोदे (23), अर्जुन नाना सरोदे (25), नीता चेतन सरोदे (45) यांना धुळे शहरातून प्रभारी निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, शरद पाटील, रवी पाटील, दीपक माळी, सूर्यकांत साळुंखे, सिद्धांत शिसोदे यांनी अटक केली तर संशयित आरती नाना सरोदे (48) यांना अमळनेर शहरातून पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, सुनील हटकर, कपिल पाटील यांनी अटक केली. संशयितांची पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव यांनी कसून चौकशी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !