भुसावळात तापले राजकारण : बाजार समिती निवडणुकीच्या धामधूमीत तडकाफडकी प्रशासकांची उचलबांगडी
डी.व्ही.पाटील यांनी स्वीकारला पदभार : जे.बी.बारी यांची उचलबांगडी
Politics heats up in Bhusawal : In the hustle and bustle of Bazar Samiti elections, rash administrators pick up भुसावळ : भुसावळ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रणरणत्या उन्हात आखाडा तापला असतानाच व दोन दिवसांवर निवडणूक आल्यानंतर अचानक बाजार समितीवर नियुक्त प्रशासकांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्याने भुसावळातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून जे.बी.बारी यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र त्यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी सहकार अधिकारी डी.व्ही.पाटील यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधक संतोष बीडवई यांनी केली आहे. मंगळवार, 25 रोजी सायंकाळी याबाबतचे आदेश निघाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, बुधवारी दुपारी डी.व्ही.पाटील यांनी पदभार स्वीकारला.
तडकाफडकी बदलीने उडाली खळबळ
भुसावळ बाजार समितीसाठी 28 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी या निवडणुकीत प्रथमच एकत्र आले असून उभयंतांनी सर्व 18 जागांवर उमेदवार उभे केले आहेत तर भाजपाचे आमदार संजय सावकारे यांनीदेखील सर्वच जागांवर उमेदवार दिले असून आगामी निवडणुकांसाठी ही निवडणूक लिटमस टेस्ट ठरणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या धामधूमीत बाजार समितीवरील प्रशासक जे.बी.बारी यांना अचानकपणे हटवण्यात आल्यानंतर राजकीय गोटात तर्क-वितर्क लढवले जात असून बारी यांच्या जागी सहकार अधिकारी डी.व्ही.पाटील यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला असून बुधवारी त्यांनी दुपारी पदभार स्वीकारताच कामाला सुरूवात केली. आदेशानंतर कामास सुरूवात केल्याचे पाटील यांनी सांगितले.

