जळगाव एसीबीतील पोलीस महासंचालक पदाचे मानकरी हवालदार रवींद्र घुगे यांचा सन्मान
पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी एसीबी कार्यालयात केला गौरव
Honoring Constable Ravindra Ghuge as Director General of Police in Jalgaon ACB जळगाव : गुन्ह्यांचा जलदगतीने तपास आणि पोलीस कामकाजात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल खान्देशातील 27 कर्मचार्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी जाहीर केले. जळगाव एसीबीतील पोलीस हवालदार रवींद्र धोंडू घुगे यांनाही महासंचालक पदक जाहीर झाल्यानंतर गुरुवारी सकाळी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांनी घुगे यांचा पुष्पगुच्छ देवून गौरव केला. याप्रसंगी कर्मचार्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत घुगे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी निरीक्षक संजोग बच्छाव व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीची दखल
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत हवालदार रवींद्र धोंडू घुगे यांची पोलीस दलातील कामगिरी अतिउत्कृष्ट व गौरवपूर्ण राहिली आहे. सेवा कालावधीमध्ये त्यांना 195 बक्षिसे, नऊ प्रशंसा पत्रके व एकूण 10 अतिउत्कृष्ट अभिप्राय मिळालेले आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत बुधवारी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलीस अधीक्षक (वाचक) नरेंद्र पवार यांनीही त्यांचा गौरव केला आहे.


